Sunday 19 February 2012

मला भेटलेला एक संघ प्रचारक


     तसे पाहता अर्जुन (नाव बदलले आहे ) आणि मी २-३ दिवसच एकत्र होतो. काही जन अल्पावधीत आपली छाप सोडून जातात. त्यातला हा. म्हणून त्याच्याबद्दल काही लिहावे असे वाटत होते. त्यासाठी मी त्याची वयक्तिक माहिती जाणून घेत होतो.

     तो मुळचा बेळगावचा. २३-२४ वर्षाचा, कुर्ता पैजामा परिधान केलेला, स्मित हास्य असणारा माझ्या तालुक्यातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक. अर्जुनचे शालेय शिक्षण बेळगावात झाले. अभियांत्रिकीसाठी तो महाराष्ट्र आला. BE झाल्यावर तो पुण्यातल्या एका नावाजलेल्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता. त्याचे आई आणि वडील दोघेही शिक्षक. अर्जुनचा भाऊ MTech तर बहिण MBA होल्डर. शिक्षित घरातला मुलगा संघ कार्यात स्वताहून कसा आला असेल असा प्रश्न माझ्या पांढरपेशी मनाला पडला. लहानपणापासून तो संघाच्या शाखेत जात असत. त्यामुळे साहजिकच संघाचे विचार त्याच्या मनात खोलवर पोहचलेले. engineering  करत असतानाही तो होस्टेलवर शाखा घेत असत. सत्र परीक्षेनंतर हैदराबादला संघाच्या बोद्धिक कार्यशाळेला जात असत. ह्या काळातच त्याचे विचार परिपक्व झाले.


     एक वर्ष नोकरी केल्यावर अर्जुनने नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्याला किमान ३ वर्ष संघ प्रचारक बनायचे आहे हा मनसुबा घरी सांगितला. कोणत्याही पांढरपेशी मनाला अर्जुनचा हा निर्णय पटण्यासारखा नव्हता. त्याचे आई वडीलही या गोष्टीला अपवाद नव्हते. आई वडील परवानगी देत नाही हे बघून तो हतबल झाला पण त्याचे चित्त आणि लक्ष ढळले नाही. अर्जुनने मित्रांना पटवून सांगितले कि तो ३ वर्षानंतर परत नोकरी करेल आणि याबाबतची खात्री मित्रांनी आई वडिलांना द्यावी यासाठी त्याने मित्रांना घरी बोलावले. मित्र घरी आल्यावर पलटले आणि त्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. ह्या सगळ्या प्रकारामुळे आई वडिलांचा विरोध अजूनच वाढला. अखेर आई वडिलांची कशीबशी समजूत काढून अर्जुनला १ वर्ष प्रचारक बनण्याची परवानगी मिळाली.


     आता संघ प्रचार कार्यात येऊन अर्जुनला ६-७ महिने झाले. प्रचार कार्य जोरात चालू आहे. आठवड्यातून एकदा घरी फोन करतो. बहुतेक वेळा आई फोनवर रडत असते. ह्या रडण्याचे कारण एकच "समाजाने दिलेली वागणूक." अर्जुनच्या घरी पहिले कधीही न येणारे लोक आता विनाकारण येत असतात. अर्जुनच्या करिअर, लग्नाबाबत विनाकारण चौकश्या करतात. एका ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अर्जुनच्या आई वडिलांचे मानसिक खच्चीकरण करण्याची आघाडी उभारली. ब्रिगेडचे कार्यकर्ते अर्जुनच्या घरी जाऊन सांगत कि तुमचा मुलगा बामणाच्या नादी लागून खुळा झाला आहे. त्याला मनोरुग्ण विकार तज्ञाकडे घेऊन जावे असे सल्ले दिले.
ह्या सगळ्या गोष्टीमुळे आई वडिलांना किती त्रास झाला असेल हे सांगण्याची जरुरी नाही.


     प्रचार कार्यात आल्यापासून अर्जुन २-३ वेळा घरी जाऊन आला. घरून निघताना तो मन घट्ट करून निघतो. बसमध्ये असताना सतत घरचा विचार येतो. कुटुंबाला होणारा मानसिक त्रास कमी करण्यासाठी आल्या पावली माघारी परतण्याचा विचार येतो. पण दर वेळी मनावर ताबा ठेऊन मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन संघ विचार वाचतो. त्यामुळे त्याला जगण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची नवी उमेद मिळते आणि घरी जाण्याचा विचार मनातून नाहीसा होतो. तसे त्याचे विचार हे खूपच प्रगल्भ. ह्या विचारांवर त्याचा प्रवास सुरु आहे.


     हा ब्लॉग इथेच संपवतो. पुढील ब्लॉग मध्ये त्याला आलेले बरे वाईट अनुभव आणि त्याचे विचार सांगेल. तूर्तास रजा घेतो.