Monday 19 March 2012

मला भेटलेला एक संघ प्रचारक भाग २

       Engineer असलेला अर्जुन अचानक नोकरी सोडून संघ प्रचारक कसा बनला हे माझ्यासाठी एक कोडेच होते. त्याच्याशी २-३ दिवस गप्पा मारल्यावर मला त्याच्याबद्दल माहिती मिळाली आणि हे कोडे सुटले. त्या गप्पामधला काही भाग इथे देत आहे. (मागच्या ब्लॉग मध्ये त्याची थोडी फार माहिती दिली होती.)

मी : "घर दार सोडून तू संघ प्रचारक कसा काय बनला?" 
तो : "संघाचे अप्रतिम विचार!" 

मी : "पण संघाचे विचार आहे तरी काय?"
तो : "हिंदुस्तानची अखंड एकता निर्माण करणे. ती टिकवून ठेवणे."

मी : "संघ बर्याच वर्षापासून काम करत आहे तरी पाहावे तसे यश मिळताना दिसत नाही. असे का?"
तो : "संघाचे काम हे वैचारीक काम आहे. आपलेच लोक आपल्या देशाला खूप नाव ठेवतात पण ते स्वत कधी      बदलणार नाहीत आणि दुसर्याकडून बदलाची अपेक्षा ठेवतात. अशा लोकांना बदलायचे काम खूप कठीण आहे. त्यासाठी वेळ हा लागणारच. Chemistry मध्ये Titration करताना समजा १५ व्या थेंबानंतर Flask मधल्या द्रावणाचा रंग बदलत असेल तर ह्याचा अर्थ असा नाही कि पहिले १४ थेंब वाया गेले. पहिल्या १४ थेंबामुळेच १५ व्या थेंबाला अर्थ आहे. तसेच आमचे कार्य आहे. संघाची ३ री पिढी आज कार्यरत आहे. आज ना उद्या देश, समाज सुधारणारच."


मी : "तू बेळगावचा असूनही छान मराठी बोलतो. कर्नाटकात प्रचार कार्य का नाही करत?"
तो : "थोडा फार भाषेचा अडसर. कानडी बोलता येते पण कानडी वर प्रभुत्व नाही. बेळगावचा संघ महाराष्ट्राच्या विभागात येतो."
मी : (उत्तेजित होऊन ) "म्हणजे बेळगाव महाराष्ट्रात असावे असे संघाचे मत आहे."
तो : "संघ प्रांतवादाला मान्यता देत नाही. संघ फक्त अखंड हिंदुस्तानला मान्यता देतो. प्रशासकीय सोयींसाठी कोणता प्रांत कुठे असावा हे सरकारने ठरवावे."


मी : "कार्यात आलेले चांगले अनुभव?"
तो : "भरपूर फिरायला मिळाले. नवे मित्र मिळाले. काही लोक खूपच छान भेटले. काही लोक खूप प्रेमाने बोलतात, वागवतात. त्यांच्या घरी आग्रहाने बोलावत. कधी कधी तर दिवसातून २० कप चहा प्यावा लागला."


मी : "कार्यात आलेले वाईट अनुभव?"
तो : "आले काही वाईट अनुभव पण ते सांगणे कोत्या मनाचे लक्षण आहे असे वाटते."
मी : "पण मला वाईट अनुभव ऐकायचे आहे."
तो : "एका गावात प्रचार कामासाठी गेलो होतो. तिथे गावकर्यांना समजले कि मी संघ प्रचारक आहे. त्यांनी मला घरात येऊ दिले नाही. संघ प्रचार कार्य करून दिले नाही. काही ठिकाणी २-२ दिवस उपाशी होतो."


मी : "उपाशी का? स्वताकडे पैसे नाही ठेवत?"
तो : "नाही. संघ आम्हाला प्रवास भाड्याचे पैसे देतो. जेवणाची सोय त्या त्या गावातील संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरी असते. काही गावात जेवायला कुणीच नाही सांगितले तर उपाशी राहायचे."
मी : "उपाशी पोटी कार्य करता येते?"
तो : "कार्य करण्यासाठी फक्त इच्छाशक्ती, संघाचे विचार हवेत. बाकी गोष्टी गौण आहे."


मी : "तुझे विचार ऐकून मला तुझ्यावर ब्लॉग लिहावासा वाटतोय. शीर्षक असेल - एका ध्येयवेड्याची गोष्ट."
तो : (गालातल्या गालात हसून ) "मी वेडा असतो तर आज Carrier, संसार ह्या गोष्टीच्या मागे असतो. मी शहाणा आहे म्हणून मी आज संघ कार्यात आहे."


मी : "तरी पण मी तुझ्यावर १ ब्लॉग लिहणार आहे. तुझी परवानगी हवी."
तो : "Ok. तू लिहू शकतोस पण एका अटीवर. माझे नाव उघड नाही करणार तू."
मी : "का? तुझे नाव लिहण्याने काय फरक पडणार आहे?"
तो : "फरक मला पडणार आहे. प्रसिद्धीमुळे अहंकार वाढतो. मी पणा वाढतो. एकदा का मला प्रसिद्धीची चटक लागली तर कार्य बाजूला राहील आणि मी फक्त प्रसिद्धीसाठी काम करेल. त्यासाठी माझे नाव न टाकता समस्त प्रचारकांचा एक प्रतिनिधी असा उल्लेख कर."


       हा अर्जुन माझ्या गावात आला त्याच्या दुसर्या दिवशी त्याच्या छातीत अचानक दुखायला लागले. तो नाशिक मधल्या संघाच्या रुग्णालयात गेला आणि २ दिवसात बरा होऊन परतला. त्याच्या जागी कुणी दुसरे असते तर त्याने सरळ घरचा रस्ता पकडला असता. अर्जुनचे आजोबा वारले तेव्हा तो त्यांचे दहावा उरकून परत कार्याला लागला. अकराव्याला सुद्धा घरी थांबला नाही.
      असा हा अर्जुन. काही तरी ध्येय घेऊन देशासाठी काम करतोय. तो योग्य करतोय कि अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावे.