Sunday, 7 October 2012

चारोळ्या


तू  दिसलीस तेव्हा
आला आनंदाश्रूंचा पूर,
पुरे झाला विरह
जाऊ नको दूर...



                                                     प्रत्येकाला स्वतःचा एक
                                                     विशिष्ट गुणधर्म असतो,
                                                     दारूला पाणी म्हटले तरी
                                                     त्याला पाण्याचा सुगंध नसतो....



नदीच्या प्रवाहाला
दिशा असते,
तिची दिशा चुकल्यास
आपली दुर्दशा होते.......

Saturday, 11 August 2012

अस्तित्व

ढगातुन पडून पोरका झालेला थेंब
जिथे पडतो तिथेच त्याचे अस्तित्व
नभातुन भूमीवरच्या या प्रवासात
त्याच्या इच्छेला नसते महत्व
पण पूर्वसंचित चांगलं
तर योग्य ठिकाणी पडतो
झरा, नदी, सागर यात
एकरूप होऊन प्रवाहित होतो
सहवास चांगल्याचा
म्हणून पूजनीय बनतो
नेमका जर पडला डबक्यात
अस्तित्व त्याचे कुजते
त्याची काहीही चूक नसताना
जगण्याची आशा विझते



- माझी आई



Sunday, 22 July 2012

स्टुडीओतील करामती


     बर्याच महिन्यानंतर काल फोटो स्टुडीओमध्ये जाण्याचा योग आला. पासपोर्ट साईझ फोटो काढायचे होते. त्यामुळे मी माझा एक फोटो एडीट करून पेन ड्राईव मध्ये घेऊन गेलो. (फोटोचा ब्याकग्राउंड एडीट केला फक्त. तसा मी दिसायला स्मार्ट आहे. त्यामुळे चेहर्याला एडीट करायची गरज नव्हती तरी पण उगाच छंद म्हणून चेहरा एडीट केला.) स्टुडीओ तर पुर्णपणे डिजीटल होता. कॉम्पुटरला जोडण्यासाठी वेगवेगळे डिव्हाईसेस टेबलावर रचलेले होते. स्टुडीओमधल्या प्रत्येक भिंतीवर फोटो लावलेले. हनुवटीवर बोट ठेऊन लाजणाऱ्या मुली असो वा गॉगल घालून दबंग बनणारे कॉलेजची पोर असो, गणवेश घातलेले शाळकरी पोर-पोरी असो वा म्हातारे-कोतारे. सगळे मस्त दिसत होते. स्टुडीओ मालकाचे पुरस्कार स्वीकारतानाचे, सोम्या गोम्या कलावंताबरोबरचे बरेच फोटो होते.


     मालक स्व:ता कॉम्पुटरवर एडिटिंग करत बसला होता. एका फोटोमध्ये 3 जन होते. त्यातून त्याने एका गृहस्थाचा फोटो वेगळा केला. टी शर्ट घातलेल्या त्या गृहस्थाला चक्क कोट आणि टाय परिधान करवला. (कोट आणि टाय  मध्ये पण विविधता होती. गिऱ्हाइकाणे रंग सांगण्याचाच काय तो उशीर लगेच कोट आणि टाय तयार.) च्यायला, कमाल आहे ह्यांची. त्या माणसाने जीवनात कधी शर्टइन केली नसेल पण त्याचा शेवटचा फोटो मात्र टाय आणि कोट मध्ये! (शेवटचा फोटोच होता हे मी छातीठोक पणे सांगू शकतो कारण फोटो तयार होऊन आल्यावर तो फक्त भिंतीवर लावण्याच्याच आकाराचा होता.) असो, असतात एक एक जन असे.
   

     म्हटले आता आपण पण थोडी गम्मत पाहू. म्हणून माझा फोटो न देता सहजच उभा राहिलो. आता तर कहर म्हणावा लागेल असे एडिटिंग चालू होते. टक्कल असलेल्याला नवी हेअर स्टाईल बहाल करण्यात आली तर चेहऱ्यावर कायमस्वरुपी असणारा जखमेचा व्रण गायब करण्यात आला. काळ्याला गोरा बनवला आणि चष्मावाल्याला गॉगल घातला. (तो चष्मावाला मी नव्हतो हे पहिलेच सांगून देतो.) ढवळ्याचे काळे केले गेले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या तारुण्यपिटीका कि काय म्हणतात त्या उडवण्यात आल्या. असो, असतात एक एक जन असे.


     भरपूर एडिटिंग पाहिल्यावर मी माझा पेन ड्राईव दिला. माझा फोटो एडीटरने पेन ड्राईव मधून कॉम्पुटरमध्ये कॉपी केला. फोटोमध्ये मी मस्तच दिसत होतो. (तसा मी दिसायला लहानपणापासूनच छान दिसतो. आता तर फोटोला एडिटिंगची थोडीफार साथ होतीच.) असो विषयांतर झाले पण खरे ते काय बोललो. पण त्याच्या एकही एडिटिंग सोफ्टवेअर मध्ये उघडत नव्हता. (आईच्या गावात! मी तो फोटो एडीट केल्यावर कसा काय सेव्ह केला काय माहित.) खूप वेळ गेल्यावर मी बोललो, "जाऊ द्या, नसेल ओपन होत तर द्या माझा पेन ड्राईव." एडीटर म्हणाला, "2 मिनिट थांब आणि माझी करामत बघ." मग मी परत गम्मत बघायला सज्ज!


     त्याने माझा फोटो कॉम्पुटरवर उघडला, स्व:ताचा भारीमधला कॅमेरा पोतडीतून बाहेर काढला आणि कॉम्पुटर स्क्रिन वर क्लीक केला. (आइला! हि होती त्याची करामत!) हातचे गिऱ्हाईक जाऊ न देण्याची कला पाहून वाटले हा मराठी माणूस नसणारच! पण भिंतीवरच्या सप्तशृंगी मातेचा फोटो पाहून तो मराठीच माणूस आहे हे माझ्या चाणाक्ष नजरेने ओळखले. (तसा मी लहानपणापासूनच हुशार आहे. एव्हाना हे तुमच्या चाणाक्ष बुद्धीला लक्षात आले असणारच.) मग त्याच्या एडिटिंगची स्तुती करून त्याला खुश करून टाकले. (तरी पण त्याने डिसकौंट नाही दिला.) माझे फोटो घेतल्यावर त्या सप्तशृंगी मातेला आणि त्या मराठी स्टुडीओ मालकाला मनोमन नमस्कार करून मी स्टुडीओ बाहेर पडलो.





  

Saturday, 7 July 2012

मंतरलेले ते 5 दिवस!!!!

     नंदगाव. भारताच्या नकाशावर काय पण राजस्तानच्या नकाशावरही लवकर सापडणार नाही असे ठिकाण. अबूरोड पासून 60 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव एका बाजूने माउंट अबूच्या पर्वतरांगांच्या पायथ्यास वसलेले आहे. बाकी तिन्ही बाजूस रेतीचा सागर. जसे जसे आम्ही नंदगावच्या जवळ जात होतो तसे तसे खुरटी झुडपे आणि रेतीचे प्रमाण वाढत होते. बस मधून इथले वातावरण पाहून पुढील 5 दिवस कसे जातील याबाबत साशंक होतो. आम्ही 5 दिवसाच्या शिबिरासाठी नंदगावला आलो होतो. शिबीरचे नाव होते गोवत्स पाठशाला. पाठशाळेत पोहचताच आम्ही आश्चर्यचकित झालो. रेतीच्या सागरावर दुतर्फा हजारो हिरवीगार झाडे आमच्या स्वागतासाठी सज्ज होती. हिरवेगार वातावरण पाहून मन सुखाऊन गेले.



    

     शिबिरात आलेल्यांमध्ये 80% गोवत्स हे तरुण होते. शिबिराची सुरवात सकाळी 5 ला झाली. ज्यांनी आयुष्यात झोपेतून उठून पहाटेच्या 5 ची वेळ पहिली नव्हती (बहुतेकांनी जागरण करून पहाटेची 5 ची वेळ पाहिलेली असावी) ते सुध्दा लवकर उठून प्रभात फेरीसाठी तयार झाले. सगळ्यांचा पेहराव तो काय.. आहाहा... चक्क धोतर-बंडी अथवा कुर्ता-पायजमा! मेक-अप तर अजून भारी. सगळ्यांच्या कपाळावर U आकाराचा चंदनाचा अथवा कुंकवाचा टिळा! जीन्स ऐवजी धोतर, सौंदर्य प्रसादना ऐवजी टिळा, ब्रांडेड बुटा ऐवजी अनवाणी पायाने फिरणे हे सगळेच विलक्षण होते. भजन कीर्तन करत प्रभात फेरी साधारणता 2-3 कि.मी. अंतरावर जात असे. वाळवंट तुडवत तुडवत भक्तीत लीन झालेले गोवत्स पाहून मनाला एक वेगळाच आनंद होत होता.
 




     समोर 15-20 गोठे होते. प्रत्येक गोठ्यात अजून एक छोटा गोठा होता. साफ सफाई करण्याच्या वेळी सर्व गाई छोट्या गोठ्यात ठेवलेल्या असत. प्रत्येक गोठ्यात 100 ते 250 पर्यंत गाई होत्या. (जवळपास 20000 गाई ह्या गोशाळेत आहे ) एका बाजूला पाण्याचा हौद तर एका बाजूला शेणाचा ढिगारा होता. गायीसाठी चारा खाण्यासाठी पत्र्याचे हौद बनवलेले होते. आता वेळ होती गोसेवेची. गोठ्यातले शेन गोळा करून गोठा स्वच्छ करत होतो. गायीसाठी पौष्टिक द्रावण चार्यामध्ये टाकत होतो. कुणी आई नसलेल्या वासराला बाटलीने दुध पाजत होते तर कुणी गाईच्या पाठीवर हात फिरवत होते.





    
     स्वच्छता मोहीम झाल्यावर नाश्ता करून प्रवचनाला (चर्चा सत्र ) जात होतो. ह्या सत्रात वैचारिक देवाण घेवाण तर होतच होती पण संकीर्तनामुळे वातावरण भारलेल्यासारखे असत. काही गोवत्स आनंदाने नाचत होती तर काही जन तर फुगडी आणि दहीहंडी करण्यात धुंद झालेली. हे सत्र संपल्यावर जेवण करून विश्रांती घेत. जेवण तर इतके अप्रतिम असत कि त्यापुढे शाही रेस्टारेंट पण फिके पडतील. इथले दुध तर जिंदगीत कधी पिलो नसेल इतके चविष्ट. तुपातले पदार्थ तर अहाहा... अजूनही त्यांची चव जिभेवर रेंगाळत आहे. गावठी गाईचे दुध पहिल्यांदा पीत होतो. (घरी आल्यावर जर्सीचे दुध, तूप खाणे कमी झाले आणि चहा तर सुटल्यातच जमा ) विश्रांतीनंतर परत अंघोळ करावीच लागत. भयंकर उकाडा असल्यामुळे पाण्याची भरपूर सोय केलेली. पुढील सत्राला जाण्यापूर्वी थंड ताक अथवा ज्यूस उकाडा पळवायला मदत करत. ह्या सत्रात पण वैचारिक देवाण घेवाण, प्रश्न-उत्तरे संकीर्तन चालत असे.


    गोमातेची आरती झाल्यावर जेवण करून परत भजन कीर्तन करत. दुध पिऊन भक्ती भावात झिंगणारे तरुण प्रथमच पाहत होतो. (आज काल झिंगण्यासाठी दारू लागते पण पाठशाळेत तर दुधानेच नशा चढला होता.) इथे वेंगा बोईज नाही विठ्ठल होता, मडोना नव्हती मीरा होती, शकिरा नव्हती श्रीकृष्ण होता. गोपाल होता. राधा होती. गोमाता होती. भाव होता. भक्ती होती. "नैनोमे निंद भर आई श्रीबिहारीजीकें"  हे भजन झाल्यावर पाठ्शालेचा दिवस संपत असत.


     एके दिवशी पतमेडा गोधाम तीर्थला गेलो. नंदगाव पासून 70 कि.मी. अंतरावर असलेल्या पतमेडा मध्ये प. पू. दत्तशरणजी महाराजांनी 1993 मध्ये 8 गाई कसायांपासून सोडवून गोशाळेची स्थापना केली. आज पूर्ण राजस्तानमध्ये पतमेडा गोशाळेच्या विविध शाखेमध्ये सुमारे सव्वा लक्ष गाई आहे. गाईसाठी सुसज्ज (वातानुकुलीत आणि क्ष किरण यंत्रणा ) असे रुग्णालय आहे. ह्या धन्वंतरीमध्ये रोज अपघातात जखमी झालेल्या गायीना उपचारासाठी आणले जाते. काही गायीना पाय नव्हते तर काहीना शिंग. कुणाच्या पाठीतून रक्त वाहत होते तर कुणाच्या डोळ्यात प्रकाशच नव्हता. अश्या गाई पाहून कुणाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या नसत्या तर नवलच!


      प. पूज्य  दत्तशरनजी महाराज आणि त्यांचे शिष्य प. पुज्य राधाकृष्णजी महाराज ह्यांनी गोवत्स पाठशाळेचे आयोजन केले होते. राधाकृष्णजी महाराज अवघे 30 वर्षाचे. त्यांची वाणी, गाणी अप्रतिम. दोन्ही महाराजांनी हिंदूंसाठी (मानवजातीसाठी ) गाईचे महत्व का आहे ते सांगितलेच पण पुरावे देण्यासाठी आयुवेदाचार्य, डॉक्टर्स तसेच सामाजिक संस्थेच्या मान्यवर लोकांचे चर्चा सत्र आयोजित केले होते. म्हणजे इथे फक्त भक्ती नव्हती तर विज्ञान पण होते. एक चळवळ होती. गोहत्या थांबवण्याचे आवाहन होते आणि गोसंवर्धन करण्याची विनंती होती. गोहत्या बंदी कायद्याचे मार्गदर्शन होते. सगळ्यांचा ध्यास, विचार, कृती एकच - गोसेवा.






     पाठ्शालेचा शेवटचा दिवस. निघण्याची शारीरिक तयारी झालेली पण मानसिक तयारीला वेळ लागणार होता. राधाकृष्णजी महाराजांच्या दर्शनाला गेलो. पाहतोय तर काय!! नेहमी उल्हासित असणारे वातावरण आज धीर गंभीर झाले होते. महाराजाचे लाडके शिष्य चक्क महाराजांना मिठी मारून रडत होते. महाराजजी स्वताच्या रुमालाने शिष्यांचे डोळे पुसत होते. दर्शन घेऊन निघालो आणि ठरवले पुढच्या वर्षी परत येऊ.


     घरी आलो ते विचार घेऊनच. आता दिशा शोधायची आहे, कृती करायची आहे, गोसेवा करायची आहे. आपण करणार का मदत गोसेवा, गोसंवर्धन आणि गोहत्या थांबवण्यासाठी???

 जय गोमाता, जय गोपाल !!!!!!!







 

Tuesday, 5 June 2012

माधवरावांचा आत्मा

     सकाळची वेळ. सोफ्यात आरामात बसून माधवराव वृत्तपत्र वाचत होते. अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. सोफ्यावरून उठण्याचा प्रयत्न करताना ते जमिनीवर कोसळले. पण लगेचच त्यांना बरे वाटू लागले. ते पटकन जमिनीवरून उठले आणि पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघराकडे निघाले. बाहेर काहीतरी पडल्याच्या आवाजामुळे शांता माधवरावाकडे न बघता दिवाणखान्यात आली आणि तिने जोरात किंकाळी फोडली. किंकाळीचा आवाज ऐकून माधवराव पळत दिवाणखान्यात आले आणि बघताय तर काय?? त्यांच्यासारखाच एक इसम जमिनीवर पडलेला. शांता त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून माधवराव चकित झाले. त्यांना जुळा काय पण साधा लहान मोठा भाऊ पण नव्हता. काही कळण्याच्या आत शेजार पाजारचे लोक आणि डॉक्टर आले. त्या देहाची तपासणी झाली.

     "He is no more, " असे डॉक्टरांनी सांगताच शांताने गळा काढला. आता मात्र माधवराव भानावर आले. आपण मेलो असल्याची खात्री झाली. दरदरून घाम फुटला. रक्तदाब वाढल्याची जाणीव झाली. वाढलेल्या रक्तदाबामुळे आपण परत मरणार ह्या भीतीने ते चांगलेच अस्वस्थ झाले. पण एकदा मेलेला माणूस परत मरू शकत नाही ह्या जाणीवेने त्यांना समाधान वाटले. आपण जिवंत नाही हे पाहून मात्र त्यांना रडू कोसळले. माधवराव देहाने गेले. आता उरला होता फक्त माधव. परगावी असणारा सुहास संध्याकाळपर्यंत घरी आला. सगळी तयारी झाली. राम नाम सत्य हे च्या गजरात अंत्ययात्रा निघाली. "माधवराव अमर रहे " अशी घोषणा कुणीतरी द्यावी असे माधवला मनोमनी वाटले आणि स्व:ताचेच हसू आले. सुहासने भडाग्नी दिला. चितेवर आपला देह जळताना पाहून माधवला एक sms  आठवला,

मंजिल तो तेरी यही थी 
बस जिंदगी गुजर गई तेरी आते आते,
क्या मिला तुझको ईस दुनियासे 
अपनोनेही जला दिया तुझको जाते जाते।

     दुसर्या दिवशी लांब उभे राहूनच माधव अस्थिविसर्जन क्रिया बघत होता. अचानक पाठीवर थाप पडल्याने माधव बिचकला. मागे वळून पाहतोय तर काय विन्या दात काढून हसत म्हणाला, "मृत्युलोकात स्वागत! काय मध्या, कस वाटतंय मरून?"
"...?..."
"भांबवला ना? अरे मी पण भांबवलो होतो 6 महिन्यांपूर्वी."
विन्याचे भूत पाहून माधव गडबडला. पण लगेचच परिस्तिथी पाहून सावध झाला.

"विन्या, मला इतक्यात मरायचे नव्हते रे. खूप स्वप्न पूर्ण करायची होती."
"मध्या..."
"खूप स्वप्न होती रे!"

"रडू नको रे. रडून काय पुन्हा जिवंत होणारेस का? बर झालो आपण मेलो ते. जिवंत असताना किती मरणयातना भोगल्या. पोटासाठी काम करा. कामाचा ताप, तान-तणाव, आर्थिक अडचणी, मुलाचं शिक्षण, लग्न, बायकोचे आजारपण करत करत पार थकून गेलो होतो. आता विश्रांती घेतोय."
"तुझ खर आहे रे, पण मला..."

"मेल्यावर कुणाला उत्तरे द्यावी लागत नाही. मुळात मेल्यावर प्रश्नच पडत नाही. प्रश्न पडतात ते जिवंत असताना. त्यांची उत्तरे शोधत शोधत आयुष्य निघून जाते." विन्या हसतच बोलला.

"स्व:ताला काय मोठा तत्त्वज्ञ समझतोस का? दु:खाची कारणे हसून सांगायला मोठा स्तितप्रज्ञ लागून चालला का? "
"नाही रे मध्या, जिवंतपणी कुणा जीवंताचे सांत्वन इतके मनापासून केले नव्हते. मनापासून सांत्वन करतोय ते आत्ता, मेल्यावर आणि ते पण मेलेल्या माणसाचे." खी: खी: खी:

"विन्या, आता आपल काय होणार?"
"सगळ्याच जे होत ते होणार. माझ वर्षश्राद्ध होईपर्यंत मी भेटत जाईल तुला. नंतर मी कुठे तरी गायब होऊन जाईल सुध्याच्या आईसारखा."


"सुध्याच्या आईचा वर्षश्राध्द मागच्या महिन्यात झाला रे. मी गेलो होतो कार्यक्रमाला."
"हो माहितेय. बुंदीचा फडशा पडताना दिसला होता तू." खी: खी: खी:
"हलकट साला."

"सुध्याची आई भेटायची इथे. सुध्याचे गमतीदार किस्से संगायची. खूप हसायचो मी. साल्या तू इथे लवकर यायला पाहिजे होता. धमाल केली असती."

"माझ्या मरनावरच तापलेला होता का  @@@@@?"
"नाही रे." खी: खी: खी:

4-5 दिवसानंतर,
"घरातले सुतकी वातावरण पाहून खूप त्रास होतो रे. शांता, सुहास, सून आणि नातवंडाकडे पाहून खूप वाईट वाटते."
"मग दहाव्याला लगेच पिंडाला शिवणार वाटत!"
"हो."

"वा गड्या! तू जिवंत असताना सुहासला तुझ महत्व कळले नाही. तुझ्या उतारवयात त्याने तुमच्या सोबत रहावे हे कधीच कळले नाही. त्याचा राग तुझ्या मनात नाही??"
"बाप आहे रे मी त्याचा. मेल्यावर कसले आले राग लोभ."
"जा बाबा शिव त्या पिंडाला. पिंड ठेवल्या ठेवल्या कावळ्याला ईशारा कर. लगेच शिवतील ते पिंडाला."

     आज माधवचा दहावा. भरपूर लोक जमली. विधी झाला. कावळा लगेच पिंडाला शिवला. लोक जेवली. दुरूनच माधव सगळी घाई गर्दी बघत होता. आता वर्षश्राद्ध होईपर्यंत माधव असाच भटकणार. जिवंत असणार्यांच्या वेगवेगळ्या गमती जमती बघणार आणि हो आपल्या जोडीला कुणी येतंय का याची वाट बघणार.....

Thursday, 24 May 2012

अशीही एक Match फिक्सिंग

     
शीर्षक वाचून दचकलात? ह्या पोस्तचा IPL शी काही एक संबंध नाही. हि फिक्सिंग झाली होती एका लग्नात. मागच्या महिन्यामध्ये माझ्या एका सख्ख्या मित्राचे लग्न होते. आमचा पूर्ण ग्रुप लग्नासाठी एकत्र आला होता. लग्न वेळेवर (1 तास उशिर ) लागले. सर्वांची जेवण झाली. आता काही धार्मिक विधी चालू झाले होते. थोड्या वेळाने "जुते दो पैसे लो" चे नाट्य रंगणार होते. नवरदेवाचे बूट आम्ही सांभाळत होतो. तितक्यात  नवरदेवाकडून आदेश आला कि त्याच्या 'साल्याला' बूट देऊन टाका. नवरदेवाचे म्हणणे होते कि त्याचे मेव्हणे नाराज झाले आहे कारण ते बूट चोरू शकले नाहीत. आता झाली का पंचायत!! ज्याच्यासाठी आम्ही फिल्डिंग लावत होतो तोच म्हणे देऊन टाका बूट. झक मारून बूट द्यायची वेळ आली. 

     आमच्यातला एक पंटर सुपीक डोक्याचा. त्याने एक प्ल्यान बनवला. आम्ही नवरदेवाच्या मोठया मेहुण्याला बोलवले आणि एक ऑफर दिली. ऑफर त्याच्यासाठी चांगलीच होती. काहीही न करता त्याला 50% रक्कम बुटाच्या बदल्यात नवरदेवाकडून मिळणार होती.  मेहुन्याला ह्या फिक्सिंग विषयी वाच्यता न करण्याचे बजावले. त्याने पण संमती दिली. शेवटी काय तर चोरीचाच मामला होता. आम्ही आमचे कमिशन आगाऊ घेतले. बूट देऊन टाकले. दोन्ही पक्षाने असे दाखवले कि बूट चोरीला गेले आणि आता वधु पक्षाचा हक्क आहे नवरदेवाकडून पैशे मागण्याचा. 5000 रु. पासून घासाघीस सुरु होऊन 2000 रु. मध्ये सौदा पूर्ण झाला. नवरदेव खुश, त्याचा मेव्हना पण खुश. त्या दोघांना खुश ठेवण्यासाठी आम्ही मध्ये मलई खाल्ली तर काय वाईट? 

     पहिली फिक्सिंग नवरदेवाने केली बूट देण्याची. दुसरी फिक्सिंग आम्ही केली मलई खाऊन. दुसर्या फिक्सिंगबद्दल नवरदेव (सख्खा मित्र ) अनभिज्ञ आहे. हि पोस्त वाचून सर्व कळेल त्याला. आता मी त्याच्या फोनची वाट पाहतोय शिव्या ऐकण्यासाठी...




ताजा कलम : कामिशनच्या पैश्याची पार्टी (ओली पार्टी नाही) त्याच रात्री झाली होती. म्हणून नवरदेवाने ते पैसे मागू नये.

Thursday, 10 May 2012

अजून त्यांची वाट बघतो आहे..

गेल्या काही दिवसांपूर्वी बाल्कनीतल्या रिकाम्या कुंडीत  2 अंडे दिसले. ते अंडे कुणाचे आहे ते काही कळेना. आता तुम्हीच  फोटो  बघा आणि ओळखा. 

दिवस  1 ला 



दिवस 2 रा 




दिवस 4 था



दिवस 7 वा




दिवस 9 वा



दिवस 15 वा



दिवस 21 वा



आता तुम्ही ओळखले असेल  कि हा पक्षी कोणता आहे ते. सुरुवातीला काही दिवस  खूप  मजा आली ह्या पक्ष्याबरोबर खेळताना. पण  नंतर  त्यांच्या घाणीचा वास  असहाय  झाला होता. 21 दिवस झाले तरी उडत नवते. कुंडीबाहेर येऊन  बाल्कनीत  फिरत  आणि बाल्कनीभर घाण  करत  अ सत . कधी  कधी घरात  येत. ह्या जंगली कबुतरांनी उडून  जावे असे मनापासून  वाटत. कदाचित  अतिपरिचयात  अवज्ञा . साधारण  अंड्यातून बाहेर आल्यानंतर 40 दिवसांनी हे दोघे कबुतर उडून गेले. ते उडून  गेल्यावर बाल्कनी सुनी सुनी वाटत आहे. कुणाला हे कबुतर सापडल्यास  त्याने आणून  द्यावे. मी अजूनहि  त्यांची  वाट बघतो आहे....

Sunday, 15 April 2012

शिर्डी वोही आते हे जिन्हे साई बाबा बुलाते हे

     दर वर्षी प्रमाणे ह्यावर्षीही कोपरगाव ते शिर्डी साईबाबांच्या पादुकांची पालखी राम नवमीच्या दिवशी निघाली. मी पहिल्यांदाच  पायी जाणार्या पालखीत सामील झालो होतो म्हणून मनात भरपूर उत्साह होता. कोपरगाव ते शिर्डी साधारणता २० कि. मी. अंतर आहे. पालखी कोपरगावातून जाणार म्हणून सारा कोपरगाव लख्ख झाडून पुसून ठेवल्यासारखा दिसत होता. पालखी मार्गावर सडे रांगोळ्या काठलेल्या होत्या. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.




१ एप्रिल वेळ ५:४५ संध्याकाळ.
     मी आणि माझे मित्र चेतन, सुमित आम्ही तिघांनी सर्वप्रथम पालखीला खांदा देऊन आणि पादुकांचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरवात केली. पायी चालता येते असे सगळेच ( वय वर्ष ४ ते ७०+ ) गप्पा टप्पा करत तर कुणी भजन म्हणत, काही तर मौन पाळत भक्तिभावाने निघाले. अर्ध्यापेक्षा जास्त भक्त अनवाणी पायाने चालत होते. जमीन भरपूर तापलेली पण थंड वारा मन उल्हासित करत होता. डोक्यामध्ये विचारचक्र चालू झाले होते. सारे जन एका फकिराच्या दर्शनासाठी उतावीळ झाले होते. काय जादू असेल त्या फकीरात काय माहित पण इतके सारे लोक लोह्चुम्बकाकडे लोखंडाने आकर्षिले जावे तसे चालत होते. फकिराच्या 'श्रीमंत' देवस्थानात पोहचण्याची घाई झाली होती.
   
     नजर जाईल तिथपर्यंत जनसागर दिसत होता. रस्त्यात ठीक ठिकाणी खिचडी, पोहे, आईस क्रीम, उसाचा रस, पाणी वाटप केले जात होते. फुकट मिळतेय म्हणून काही जन ते पदार्थ घेत आणि अर्ध खाऊन फेकून देत होते. रस्त्याभर पाण्याच्या पिशव्या, कागदी डिशेश यांचा कचरा साचला होता. लहान मुले पाण्याच्या पिशव्या एकमेकांच्या अंगावर रिकाम्या करत होते. अन्नाची आणि पाण्याची नासाडी चालू होती पण कुणाला त्याची पर्वा नव्हती आणि पर्वा करूनही काही उपयोग नव्हता.
   
     अखेर शिर्डी आले. गर्दीचा महापूर दिसत होता. 'गावकरी' दरवाजातून पालखी भक्तांना प्रवेश दिला जात होता. गर्दीत थोडी फार धक्का बुक्की चालू होती. माझ्या शेजारी एक आई आपल्या लहानग्या मुलाला (६ महिन्यापेक्षा लहान असावे ) घेऊन धक्क्यातून आपल्या मुलाला सांभाळीत होती. ती रडत होती. बहुदा तिचे कुटुंब गर्दीत हरवले गेले असावे. परत एक धक्का बुक्की झाली आणि ती बाई नजरेआड झाली. तिचे काय झाले असावे हे त्या साईलाच माहित.
   
     साईबाबाची मूर्ती पाहत सगळे नतमस्तक होत होते. काही जन बाबांच्या मूर्तीचे फोटो मोबाईल फोनवरून काढत होते. पोलीस फोटो काढणाऱ्याचा मोबाईल फोन हिसकावून घेत होती. पण पुढे पाहतो तर काय तर चक्क वी.आय.पी. गेट मधून आलेल्या त्या वी.आय.पी मुल्ला मौलवींचे साईबाबाच्या समाधी बरोबर फोटो काढण्यासाठी खास फोटोग्राफर होता. आता मात्र टाळकेच फिरले. श्रद्धा आणि सबुरी च्या दरबारात माझ्यामध्ये श्रद्धा शिल्लक होती पण सबुरी गायब झाली. वी.आय.पी साठी खास फोटोग्राफर आणि सर्व सामन्यांसाठी मोबाईल फोनवरुन फोटो काढण्यास बंदी ! वारे रे संस्थान !! साईच्या फोटोसाठी भक्तांना कसली आली परवानगी ??? शेवटी आम्ही साईबाबांचा फोटो घेण्यात यशस्वी झालोच. मग दर्शन घेऊन बाहेर पडलो ते खूप सारे प्रश्न घेऊनच.
     
                              

     नियम सगळ्यांना सारखे का नाही? वी.आय.पी. गेट मधून येणारे आरामात दर्शन आणि photography करतात आणि तासनतास रांगेत उभे राहणारे भाविक साईबाबांच्या निष्ठेपोटी स्वताचे हाल सहन करून घेतात. पण खरय... निष्ठेने, रांगेत तासनतास उभे राहून दर्शन घेण्यातला आनंद खूप वेगळाच असतो. शिर्डी वोही आते हे जिन्हे साई बाबा बुलाते हे.........!!!
           

Monday, 19 March 2012

मला भेटलेला एक संघ प्रचारक भाग २

       Engineer असलेला अर्जुन अचानक नोकरी सोडून संघ प्रचारक कसा बनला हे माझ्यासाठी एक कोडेच होते. त्याच्याशी २-३ दिवस गप्पा मारल्यावर मला त्याच्याबद्दल माहिती मिळाली आणि हे कोडे सुटले. त्या गप्पामधला काही भाग इथे देत आहे. (मागच्या ब्लॉग मध्ये त्याची थोडी फार माहिती दिली होती.)

मी : "घर दार सोडून तू संघ प्रचारक कसा काय बनला?" 
तो : "संघाचे अप्रतिम विचार!" 

मी : "पण संघाचे विचार आहे तरी काय?"
तो : "हिंदुस्तानची अखंड एकता निर्माण करणे. ती टिकवून ठेवणे."

मी : "संघ बर्याच वर्षापासून काम करत आहे तरी पाहावे तसे यश मिळताना दिसत नाही. असे का?"
तो : "संघाचे काम हे वैचारीक काम आहे. आपलेच लोक आपल्या देशाला खूप नाव ठेवतात पण ते स्वत कधी      बदलणार नाहीत आणि दुसर्याकडून बदलाची अपेक्षा ठेवतात. अशा लोकांना बदलायचे काम खूप कठीण आहे. त्यासाठी वेळ हा लागणारच. Chemistry मध्ये Titration करताना समजा १५ व्या थेंबानंतर Flask मधल्या द्रावणाचा रंग बदलत असेल तर ह्याचा अर्थ असा नाही कि पहिले १४ थेंब वाया गेले. पहिल्या १४ थेंबामुळेच १५ व्या थेंबाला अर्थ आहे. तसेच आमचे कार्य आहे. संघाची ३ री पिढी आज कार्यरत आहे. आज ना उद्या देश, समाज सुधारणारच."


मी : "तू बेळगावचा असूनही छान मराठी बोलतो. कर्नाटकात प्रचार कार्य का नाही करत?"
तो : "थोडा फार भाषेचा अडसर. कानडी बोलता येते पण कानडी वर प्रभुत्व नाही. बेळगावचा संघ महाराष्ट्राच्या विभागात येतो."
मी : (उत्तेजित होऊन ) "म्हणजे बेळगाव महाराष्ट्रात असावे असे संघाचे मत आहे."
तो : "संघ प्रांतवादाला मान्यता देत नाही. संघ फक्त अखंड हिंदुस्तानला मान्यता देतो. प्रशासकीय सोयींसाठी कोणता प्रांत कुठे असावा हे सरकारने ठरवावे."


मी : "कार्यात आलेले चांगले अनुभव?"
तो : "भरपूर फिरायला मिळाले. नवे मित्र मिळाले. काही लोक खूपच छान भेटले. काही लोक खूप प्रेमाने बोलतात, वागवतात. त्यांच्या घरी आग्रहाने बोलावत. कधी कधी तर दिवसातून २० कप चहा प्यावा लागला."


मी : "कार्यात आलेले वाईट अनुभव?"
तो : "आले काही वाईट अनुभव पण ते सांगणे कोत्या मनाचे लक्षण आहे असे वाटते."
मी : "पण मला वाईट अनुभव ऐकायचे आहे."
तो : "एका गावात प्रचार कामासाठी गेलो होतो. तिथे गावकर्यांना समजले कि मी संघ प्रचारक आहे. त्यांनी मला घरात येऊ दिले नाही. संघ प्रचार कार्य करून दिले नाही. काही ठिकाणी २-२ दिवस उपाशी होतो."


मी : "उपाशी का? स्वताकडे पैसे नाही ठेवत?"
तो : "नाही. संघ आम्हाला प्रवास भाड्याचे पैसे देतो. जेवणाची सोय त्या त्या गावातील संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरी असते. काही गावात जेवायला कुणीच नाही सांगितले तर उपाशी राहायचे."
मी : "उपाशी पोटी कार्य करता येते?"
तो : "कार्य करण्यासाठी फक्त इच्छाशक्ती, संघाचे विचार हवेत. बाकी गोष्टी गौण आहे."


मी : "तुझे विचार ऐकून मला तुझ्यावर ब्लॉग लिहावासा वाटतोय. शीर्षक असेल - एका ध्येयवेड्याची गोष्ट."
तो : (गालातल्या गालात हसून ) "मी वेडा असतो तर आज Carrier, संसार ह्या गोष्टीच्या मागे असतो. मी शहाणा आहे म्हणून मी आज संघ कार्यात आहे."


मी : "तरी पण मी तुझ्यावर १ ब्लॉग लिहणार आहे. तुझी परवानगी हवी."
तो : "Ok. तू लिहू शकतोस पण एका अटीवर. माझे नाव उघड नाही करणार तू."
मी : "का? तुझे नाव लिहण्याने काय फरक पडणार आहे?"
तो : "फरक मला पडणार आहे. प्रसिद्धीमुळे अहंकार वाढतो. मी पणा वाढतो. एकदा का मला प्रसिद्धीची चटक लागली तर कार्य बाजूला राहील आणि मी फक्त प्रसिद्धीसाठी काम करेल. त्यासाठी माझे नाव न टाकता समस्त प्रचारकांचा एक प्रतिनिधी असा उल्लेख कर."


       हा अर्जुन माझ्या गावात आला त्याच्या दुसर्या दिवशी त्याच्या छातीत अचानक दुखायला लागले. तो नाशिक मधल्या संघाच्या रुग्णालयात गेला आणि २ दिवसात बरा होऊन परतला. त्याच्या जागी कुणी दुसरे असते तर त्याने सरळ घरचा रस्ता पकडला असता. अर्जुनचे आजोबा वारले तेव्हा तो त्यांचे दहावा उरकून परत कार्याला लागला. अकराव्याला सुद्धा घरी थांबला नाही.
      असा हा अर्जुन. काही तरी ध्येय घेऊन देशासाठी काम करतोय. तो योग्य करतोय कि अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावे. 










Sunday, 19 February 2012

मला भेटलेला एक संघ प्रचारक


     तसे पाहता अर्जुन (नाव बदलले आहे ) आणि मी २-३ दिवसच एकत्र होतो. काही जन अल्पावधीत आपली छाप सोडून जातात. त्यातला हा. म्हणून त्याच्याबद्दल काही लिहावे असे वाटत होते. त्यासाठी मी त्याची वयक्तिक माहिती जाणून घेत होतो.

     तो मुळचा बेळगावचा. २३-२४ वर्षाचा, कुर्ता पैजामा परिधान केलेला, स्मित हास्य असणारा माझ्या तालुक्यातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक. अर्जुनचे शालेय शिक्षण बेळगावात झाले. अभियांत्रिकीसाठी तो महाराष्ट्र आला. BE झाल्यावर तो पुण्यातल्या एका नावाजलेल्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता. त्याचे आई आणि वडील दोघेही शिक्षक. अर्जुनचा भाऊ MTech तर बहिण MBA होल्डर. शिक्षित घरातला मुलगा संघ कार्यात स्वताहून कसा आला असेल असा प्रश्न माझ्या पांढरपेशी मनाला पडला. लहानपणापासून तो संघाच्या शाखेत जात असत. त्यामुळे साहजिकच संघाचे विचार त्याच्या मनात खोलवर पोहचलेले. engineering  करत असतानाही तो होस्टेलवर शाखा घेत असत. सत्र परीक्षेनंतर हैदराबादला संघाच्या बोद्धिक कार्यशाळेला जात असत. ह्या काळातच त्याचे विचार परिपक्व झाले.


     एक वर्ष नोकरी केल्यावर अर्जुनने नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्याला किमान ३ वर्ष संघ प्रचारक बनायचे आहे हा मनसुबा घरी सांगितला. कोणत्याही पांढरपेशी मनाला अर्जुनचा हा निर्णय पटण्यासारखा नव्हता. त्याचे आई वडीलही या गोष्टीला अपवाद नव्हते. आई वडील परवानगी देत नाही हे बघून तो हतबल झाला पण त्याचे चित्त आणि लक्ष ढळले नाही. अर्जुनने मित्रांना पटवून सांगितले कि तो ३ वर्षानंतर परत नोकरी करेल आणि याबाबतची खात्री मित्रांनी आई वडिलांना द्यावी यासाठी त्याने मित्रांना घरी बोलावले. मित्र घरी आल्यावर पलटले आणि त्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. ह्या सगळ्या प्रकारामुळे आई वडिलांचा विरोध अजूनच वाढला. अखेर आई वडिलांची कशीबशी समजूत काढून अर्जुनला १ वर्ष प्रचारक बनण्याची परवानगी मिळाली.


     आता संघ प्रचार कार्यात येऊन अर्जुनला ६-७ महिने झाले. प्रचार कार्य जोरात चालू आहे. आठवड्यातून एकदा घरी फोन करतो. बहुतेक वेळा आई फोनवर रडत असते. ह्या रडण्याचे कारण एकच "समाजाने दिलेली वागणूक." अर्जुनच्या घरी पहिले कधीही न येणारे लोक आता विनाकारण येत असतात. अर्जुनच्या करिअर, लग्नाबाबत विनाकारण चौकश्या करतात. एका ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अर्जुनच्या आई वडिलांचे मानसिक खच्चीकरण करण्याची आघाडी उभारली. ब्रिगेडचे कार्यकर्ते अर्जुनच्या घरी जाऊन सांगत कि तुमचा मुलगा बामणाच्या नादी लागून खुळा झाला आहे. त्याला मनोरुग्ण विकार तज्ञाकडे घेऊन जावे असे सल्ले दिले.
ह्या सगळ्या गोष्टीमुळे आई वडिलांना किती त्रास झाला असेल हे सांगण्याची जरुरी नाही.


     प्रचार कार्यात आल्यापासून अर्जुन २-३ वेळा घरी जाऊन आला. घरून निघताना तो मन घट्ट करून निघतो. बसमध्ये असताना सतत घरचा विचार येतो. कुटुंबाला होणारा मानसिक त्रास कमी करण्यासाठी आल्या पावली माघारी परतण्याचा विचार येतो. पण दर वेळी मनावर ताबा ठेऊन मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन संघ विचार वाचतो. त्यामुळे त्याला जगण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची नवी उमेद मिळते आणि घरी जाण्याचा विचार मनातून नाहीसा होतो. तसे त्याचे विचार हे खूपच प्रगल्भ. ह्या विचारांवर त्याचा प्रवास सुरु आहे.


     हा ब्लॉग इथेच संपवतो. पुढील ब्लॉग मध्ये त्याला आलेले बरे वाईट अनुभव आणि त्याचे विचार सांगेल. तूर्तास रजा घेतो.