Saturday, 23 February 2013

भाऊबंधकी

   

           गेल्या चार दिवसापासून शकुंतला दवाखान्यातल्या खाटेवर पडून होती. बाथरूम मध्ये पाय घसरून ती पडली आणि डोक्याला मार लागला. दामोदर घरीच होता म्हणून वेळीच शकुंतलेला दवाखान्यात आणण्यात आले. दवाखान्यात आणल्यापासुनच शकुंतला कोमामध्ये होती. तिच्या खाटेच्या बाजूला दामोदर खुर्चीत बसून आपल्याच विचारात मग्न होता.


          आपला सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यापुढे दिसत होता. लग्नापासून ते एकुलत्या एक तरुण मुलाच्या अपघाती निधनापर्यंत, व्यवसायापासून ते भाऊबंधकीपर्यंत, आपल्याला कमी मिळालेल्या वडिलोपार्जित संपत्तीपासून ते स्वतः केलेले कष्ट… ह्याच कष्टातून कमावलेली संपत्ती… हे सगळे काही अजूनही लक्षात होत. पण ह्या सगळ्या पडत्या काळात शकुंतला ने जी खंबीर साथ दिली त्यामुळे आज आपण टिकून आहोत याची जाणीव दामोदरला झाली. शकुंतलेच काही बरे वाईट झाले तर आपले कसे होईल ह्या विचाराने तो अस्वस्थ झाला. अस्वस्थतेमुळे रक्तदाब वाढला, हृदयाचे ठोके एकदम वाढले आणि हृदय अचानक बंद पडले. खुर्चीतच मान तिरपी करून त्याने अखेरचा श्वास घेतला.…


          भाऊबंदानी, नातलगांनी आणि शेजार-पाजार्यांनी दामोदराचे अंत्यसंस्कार केले. दुसर्या दिवशी शकुंतला कोमा मधून बाहेर आली. डॉक्टरांनी दामोदरांच्या निधनाची बातमी कुणीही शकुंतलेला देऊ नये याची सक्त ताकीद भाऊबंदाना दिली होती. शकुंतलेला थोडे बरे वाटत होते म्हणून दामोदरांचा सगळ्यात मोठा भाऊ पांडुरंगाने शकुंतलेला स्वताच्या घरी नेले. पांडुरंगाचे कुटुंब शकुंतलेची योग्य ती काळजी घेत होते. सगळ्या जणांना पांडुरंगाच्या ह्या कृतीचे आश्चर्य वाटत होत. पांडुरंग पापक्षालन करतोय असं सगळ्यांनाच वाटू लागले.
       

          दामोदरच्या घरातले सगळे सामान पांडुरंगाच्या घरी हलवण्यात येत होते. आता कुठे लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला. हरी हा पांडुरंगाचा छोटा भाऊ तर दामोदरचा मोठा भाऊ. त्याने दामोदरचे सामान पांडुरंगाच्या घरी नेण्याच्या कृतीला जोरदार विरोध केला. भाऊबंदकी पुन्हा एकदा पेटली होती. काही लोकांनी मध्यस्ती करून वाद संपवला. हरी आणि पांडुरंग यांच्यात एक करार झाला. दामोदरच्या मालमत्तेचे योग्य प्रमाणात विभाजन करून ताबा घेण्यात आला. सगळे काही ठीक आहे असे दोघे भाऊ दाखवत होते पण इकडे दुसरीच योजना आकार घेत होती.
        

          मागच्या आठवड्यात पांडुरंगाने शकुंतलेला दामोदर गेल्याची बातमी सांगितली होती. दामोदरच्या जाण्याचा जोरदार धक्का तिला बसला होता. धक्क्यातून ती सावरत नव्हती. तिची तब्बेत वर खाली होत होती. रक्तदाब कमी जास्त होत होता. नाडी लवकर सापडत नव्हती. कशीबशी एक एक दिवस मोजत ती दिवस खाटेवरच जगत होती. ती फक्त जगत होती कारण तिला मरण येत नव्हते. घरी येउन एक महिना झाला तरी तिला खाटेवरून खाली उतरता येत नव्हते. वेगवेगळे अन्नपदार्थ, महागडे औषधं दिले जात होते तरी पण प्रकृतीला आराम भेटत नव्हता. प्रकृती ढासळत होती आणि एका संध्याकाळी शकुंतलेने प्राण सोडला.
        

         शेजार-पाजारचे सगळे गोळा  झाले. नातलग येत होते. सगळ्यांनी तिचे दुरून अंत्यदर्शन घेतले. अंत्ययात्रा स्मशानात आली. धार्मिक विधी चालू असताना शकुंतलेच्या भाच्याला दुःखाच्या भरात भास होत होते. त्याला तर चक्क प्रेत हलताना दिसत होते. भावनेच्या आहारी गेल्यावर सत्य दिसत नसते. अजून काही जणांना प्रेत हलत असल्याचा भास झाला होता. अंत्यसंस्कार लवकरात लवकर संपवण्यात आले. चिता धडाधड पेटत होती. देह जळत होता. आपल्या बापाच्या आणि काकाच्या कारस्थानामुळे पांडुरंगाच्या मुलाच्या मनात द्वेषाग्नी भडकत होता आणि मनात असून पण आपण हे टाळू शकलो नाही याचा खेद होत होता.
        

          सगळ्यांसमोर खून होऊन पण खुनाला कधीही वाचा फुटणार नव्हती….