गेल्या ८-९ दिवसांपासून त्याचे कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते. काम उरकवायच आहे म्हणून तो काम करत होता. आज पण जेवण झाल्या झाल्या रूममधे येऊन बसला. मोबाइलवर गाने लावून ऐकत होता. तिची खूपच आठवण येत होती. ती ह्या जगातुन कायमची गेली आहे ह्यावर त्याचा अजुन विश्वासच बसत नव्हता. अचानक एका अनोळखी नंबरवरुन कॉल आला. त्याने अनिच्छेनेच कॉल उचलला.
" हेलो! "
" हेलो! "
" कोण?"
" मी बोलतेय."
" मी कोण? "
"ओळख बर."
"ऐश्वर्या राय ?"
"हट."
"मग कोण? प्रियंका चोपड़ा?"
"जा रे. मी बोलतेय, मी. बाइकराइडर!"
".... "
" हेलो "
"..... "
" हेलो, हेलो"
"..... "
"टिंग टिंग टिंग"
त्याने घाबरून कॉल बंद केला.
"कस शक्य आहे." तो स्वतःशीच बोलला.
तिच भुत तर नसेल ना?
मनात वेगवेगळ्या शंका आकार घेवू लागल्या.
तितक्यात परत तिचा कॉल आला. कॉल उचलावा कि नाही ह्या चक्रात तो अडकला. भूत असेल तर??? त्याने कॉल उचलला नाही. अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला होता. तिची आत्मा अतृप्त असेल तर? ह्या विचारांमुळे त्याच्या अंगावर शहारे आले.
परत तिचा एक कॉल येऊन गेला. उचलला नाही.
थोड्या वेळाने एक मेसेज आला.
"HI , तू कॉल का उचलत नाहीयेस? नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? उद्या कॉल करते. GN SD TC."
मेसेज पाहून त्याची भीतीने गाळण उडाली. ती उद्या परत कॉल करणार आहे. उद्या तिचा कॉल आल्यावर काय करायचे? भुताबरोबर गप्पा मारायच्या? छे छे भलताच काय? कॉल नाही उचलला म्हणून ती इथेच आली तर??
असंख्य विचार डोक्यात घुमायला लागले. विचार करता करता त्याला कधी झोप लागली ते समजलेच नाही.
सकाळी उठल्यावर तिचा नंबर 'भूत' ह्या नावाने सेव्ह केला. उद्देश एकच कि तिचा कॉल चुकून पण उचलला जाऊ नये.
संध्याकाळी परत एका अनोळखी नंबरवरून कॉल आला.
"हॅलो!"
"हॅलो!"
"कोण?"
"मी बोलतेय, काल बोलत का नव्हता?"
".... "
"टिंग टिंग टिंग!"
घाबरून त्याने कॉल बंद केला.
च्यायला! आता काय करायचं? ही तर मागेच लागली आहे. काय करू?
तेवढ्यात मेसेज आला.
'काय रे बोलत का नाही? कॉल का बंद करतोय?'
विचार करून याने रिप्लाय केला.
"मी भूताबरोबर नाही बोलू शकत. Sorry."
तिचा मेसेज आला.
"भूत? कोण भूत? काय बडबड करतोय? येड बीड लागलाय का?"
तो कॉलवर बोलायला घाबरत होता आणि इथे चाटींग करायला बसला.
"तू भूत. ८ दिवसापूर्वी तू अपघातात गेली होती ना?"
"मी नाही गेले. आइक ना. कॉल उचल सगळं सांगते."
"नाही. जे सांगायचं असेल ते चॅट वर सांग. मला तुझी भीती वाटतेय. कॉल नको."
"खूप मोठी story आहे. कॉलवर सगळं क्लिअर होईल ना."
"सांगायचं असेल तर चाट वर सांग नाहीतर मी मेसेज नको करू."
"टाइप करायला वेळ लागेल. मी पूर्ण story टाइप करते. Wait कर."
"बरं."
१० मिनीटानंतर ,
"कुठून सुरुवात करू हेच कळत नाहीये. तुला आठवतंय का तू मला सिग्नलवर तुझा नंबर दिला होता? त्या दिवसाची गोष्ट आहे. त्या दिवशी मला खूप ताप आला होता. माझ्या ऑफिसमध्ये सगळे जन मला सुट्टी घेऊन घरी जाण्यास सांगत होते. पण मी सुट्टी नाही घेतली. कारण मला तुला भेटायचं होत. तो दिवस मी कसा काढला मलाच ठाऊक. ऑफिस सुटल्यावर आपण सिग्नलवर भेटलो आणि तू तुझा नंबर दिला. किती आनंद झाला काय सांगू. खूप खुश होते मी. मी तुला माझा नंबर देणार होते. पण तितक्यात सिग्नल सुटला आणि तू निघून गेला. मग मी घरी आले. माझा अवतार बघून आईला लक्षात आले कि माझी तब्बेत बरी नाहीये. ती माझा ताप बघायला थर्मामिटर शोधात होती तेव्हाच मी चक्कर येऊन खाली पडली. मग आईने डॉक्टरांना बोलावून आणले. ताप १०२ अंश होता. मला रेस्ट करण्यासाठी सांगितलं आणि माझा मोबाईल आईने माझ्यापासून काढून घेतला."
Message sent.
"मुद्याचं सांग. पाल्हाळ लावू नको."
"मी पूर्ण सांगणार आहे. हव असेल तर कॉल उचल. नाहीतर पूर्ण चॅट वाच. "
"हम्म सांग चॅटवरच."
"त्या दिवशी मला खूप लवकर झोप आली. तू माझ्या कॉलची वाट बघत बसला असेल ना? Sorry. दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठले. नाश्ता करत असताना माझी बालमैत्रीण वैशु आली. आम्ही लहानपणी एकाच गावात राहत होतो. माझ्या पप्पांची नाशिकला बदली झाली तेव्हा आम्ही नाशिकला राहायला आलो. वैशूने पुण्यात इंजिनिरिंग केले पण तिला मनासारखा जॉब मिळत नव्हता. माझ्या कंपनीमध्ये १ जागा भरायची होती. वैशूला त्यासाठीच मी नाशिकला बोलावले होते. ती तिच्या काकांच्या घरी राहत होती. त्यादिवशी आम्ही दोघी माझ्या कंपनीमध्ये बरोबर जाणार होतो. पण मला खूप ताप असल्यामुळे ती म्हणाली कि तू रेस्ट कर. मी एकटी जाते. पण ती जाणार कशी? तिच्याकडे बाईक नव्हती. माझ्या आईने तिला माझ्या बाईकची चावी दिली आणि सांगितले कि तू बाईक घेऊन सावकाश जा. अपेक्षा ऑफिस मध्ये कॉल करेल आणि तुला काहीही अडचण येऊ देणार नाही. ऑल द बेस्ट. वैशू माझी बाईक घेऊन गेली. मी माझ्या बॉसना कॉल केला. त्यांनी सांगितले कि त्यांची पण तब्बेत बरी नाहीये म्हणून आज ते ऑफिस ला येणार नव्हते आणि त्यांनी सगळे इंटरव्हिव रद्द केले. मग मी इंटरव्हिवबद्दल कळवण्यासाठी वैशूला कॉल लावला. तीने कॉल उचलला आणि काही बोलायच्या आतच मला काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला. बहुतेक वैशू बाईकवरून खाली पडली असावी. मी तिला खूप हाक मारल्या. पण तिकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. वैशू माझ्यामुळे गेली."
Message sent.
मेसेज वाचायला त्याला वेळ लागलाच. २-३ वेळा तोच मेसेज वाचला. काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्याला कळेना. ती भूत नाही हे त्याला कळलं होत. पण खात्री होत नव्हती. आनंद व्यक्त करावा तर तिची खास मैत्रीण तिला सोडून गेली आहे त्यामुळे आनंद पण व्यक्त करता येणार नव्हता. त्याने ठरवलं कि कॉल करायचा. जे मनाशी येईल ते बोलायचं. त्याने कॉल केला. रिंग जात होती. याचे विचार चालू होते. तिने कॉल कट केला.
च्यायला!! आता काय झाला?
"कॉल उचल."
Message Sent.
"रात्री बोलू."
"मला आत्ताच बोलायचं आहे तुझ्याशी."
"नाही बोलू शकत आत्ता."
त्याचे विचारचक्र सुरु झाले.
च्यायला!! हे काय नवीन? मी कॉल करतोय तर उचलत नाही. इतक्या वेळ ती माझ्या मागे लागलेली कि कॉल उचल. आता तिला काय झालं असावं? ती खरंच भूत तर नाहीयेना? जाऊ द्या. रात्री कॉल करू.
जेवण झाल्यावर तो तिच्या कॉलची वाट बघत बसला. मोबाईलची बॅटरी १००% चार्ज करून ठेवली होती. व्यवस्थित कपडे घालून, केस नीटनेटके करून बसला होता. उद्देश हाच कि व्हिडिओ कॉल झालाच तर ती इंप्रेस झाली पाहिजे.
१० वाजले,
११ वाजले. कॉल नाही आला.
त्याला वाटले आपण स्वतःहुन कॉल करावा. पण परत वाटले तिलाच करू दे. विचार करता करता तो पेंगू लागला.
थोड्यावेळाने त्याचा मोबाईल वाजला.
तिचा मेसेज होता.
"झोपल्यास का? कॉल करू का?"
ह्याने मेसेज वाचला आणि वेळ बघितली... १२ वाजलेले. च्यायला, ही नक्की भूत आहे. खरंच भूत असली तर?१२ ला कोणी कॉल करता का? भूतांची पॉवर रात्री १२ नंतर वाढते असे त्याने कुठे तरी वाचलेले आठवले. तो थोडा घाबरला. काय करू? काय करू? काय रिप्लाय करू? डोक्यात नुसता गोंधळ झालेला.
जाऊ द्या. करू कॉल.
"मी करतो." Message Sent.
ट्रिंग ट्रिंग...
"Hi."
"Hi."
"कशी आहेस?"
"बरी. तू?"
"मी ठीक आहे."
"सॉरी मगाशी तुझा कॉल उचलला नाही. पॉवर संपली होती. "
च्यायला, ही भूतच आहे. रात्री पॉवर वाढल्यावर आली आहे. कॉल कट करू का? तो विचार करत बसला.
"अरे I mean फोनची बॅटरी संपली होती."
हॅट साला. आपल्या मनात पण ना काही पण विचार येतात. तो स्वतःशी म्हणाला. भूत नाहीये ती.
"अच्छा."
"तू मला इतक्या दिवसनंतर कॉल केला. मला वाटले तू गेलीस."
".... "
"अग बोल ना.. "
"वैशू माझ्यामुळे गेली."
तिकडून रडण्याचा आवाज आला. त्याला परिस्थितीचा अंदाज आला. आता तिला सावरले पाहिजे ह्याची जाणीव होऊन तो बोलला,
"नशिबात जे असते ते कोणी चुकवू शकता का? तुझ्यामुळे नाही गेली ती. तिची जाण्याची वेळ झाली होती म्हणून ती गेली."
तीच रडणे तसेच सुरु..
"आइक ना. तू तिची मदतच करत होती ना? तिला जॉब देण्यासाठी तुझ्या कंपनीमध्ये बोलावलं होता ना."
"माझ्या बाईकवरून माझाच कॉल उचलताना पडली ती. तिच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे."
"तू तिची मदतच करत होती. यात तुझा काही एक दोष नाहीये. झाले गेले विसर. स्वतःला दोष नको देऊ."
"हम्म."
"डोळे पूस बर. रडू नको."
"हम्म."
"तू मला एका प्रश्नच उत्तर दे बर. आपण जन्माला आलो तेव्हा काय घेऊन आलो होतो?"
"मला नाही माहित."
"आग वेडाबाई, बाळ जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो फक्त एकच सत्य घेऊन येतो. ते म्हणजे मृत्यू. तो जीवनात काय करणार, काय बनणार हे काळ ठरवतो. पण तो एकच सत्य घेऊन जगतो कि तो एक दिवस मरणार आहे. जी गोष्ट आपल्या जन्मापासून आपल्या सोबत चिटकली आहे त्याला आपण कसे नाकारू शकतो? म्हणून जीवन जगताना मरणाला घाबरू नये. त्याला सामोरे जाण्याची हिम्मत ठेवायची."
च्यायला, जास्तच डायलॉगबाजी झाली. आता आवरता घेतला पाहिजे.
"बोला रडूबाई. "
"हम्म. कळतंय मला.. तुला काय म्हणायचं आहे ते. गेली काही दिवस मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयन्त करत आहे. म्हणूनच मी काल तुला कॉल केलेला. पण तू भूताचं खुळ घेऊन बसलेला."
"सॉरी."
"Its Ok. खूप उशीर झाला आहे. उद्या बोलुया का?"
"हो. उद्या येशील ना त्याच टाइम ला?"
"नाही रे. माझी बाईक सर्विस सेंटरला दिली आहे. अजून १ महिना नाही भेटणार. मी बसने जाते ऑफिसला."
"माझ्याबरोबर येशील?" हिम्मत करून विचारले.
"बघू. उद्या तर शक्य नाही. उद्या बोलू तेव्हा सांगते."
"बर."
"गुड नाईट."
"गुड नाईट. ये ग तुझं नाव काय आहे? मी विचारायचं विसरलो."
"हेहे, मी अपेक्षा."
"अपेक्षा काय?"
"अपेक्षा कुलकर्णी."
"आईला! जातवालीच आहे."
"... "
तिकडून हसण्याचा आवाज आला.
त्यांची गोष्ट सुरु होत आहे!!!
Informative Please Visit Krushi Yojana
ReplyDeleteHome Decoration
Persona 5 Fusion Calculator