Tuesday, 5 June 2012

माधवरावांचा आत्मा

     सकाळची वेळ. सोफ्यात आरामात बसून माधवराव वृत्तपत्र वाचत होते. अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. सोफ्यावरून उठण्याचा प्रयत्न करताना ते जमिनीवर कोसळले. पण लगेचच त्यांना बरे वाटू लागले. ते पटकन जमिनीवरून उठले आणि पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघराकडे निघाले. बाहेर काहीतरी पडल्याच्या आवाजामुळे शांता माधवरावाकडे न बघता दिवाणखान्यात आली आणि तिने जोरात किंकाळी फोडली. किंकाळीचा आवाज ऐकून माधवराव पळत दिवाणखान्यात आले आणि बघताय तर काय?? त्यांच्यासारखाच एक इसम जमिनीवर पडलेला. शांता त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून माधवराव चकित झाले. त्यांना जुळा काय पण साधा लहान मोठा भाऊ पण नव्हता. काही कळण्याच्या आत शेजार पाजारचे लोक आणि डॉक्टर आले. त्या देहाची तपासणी झाली.

     "He is no more, " असे डॉक्टरांनी सांगताच शांताने गळा काढला. आता मात्र माधवराव भानावर आले. आपण मेलो असल्याची खात्री झाली. दरदरून घाम फुटला. रक्तदाब वाढल्याची जाणीव झाली. वाढलेल्या रक्तदाबामुळे आपण परत मरणार ह्या भीतीने ते चांगलेच अस्वस्थ झाले. पण एकदा मेलेला माणूस परत मरू शकत नाही ह्या जाणीवेने त्यांना समाधान वाटले. आपण जिवंत नाही हे पाहून मात्र त्यांना रडू कोसळले. माधवराव देहाने गेले. आता उरला होता फक्त माधव. परगावी असणारा सुहास संध्याकाळपर्यंत घरी आला. सगळी तयारी झाली. राम नाम सत्य हे च्या गजरात अंत्ययात्रा निघाली. "माधवराव अमर रहे " अशी घोषणा कुणीतरी द्यावी असे माधवला मनोमनी वाटले आणि स्व:ताचेच हसू आले. सुहासने भडाग्नी दिला. चितेवर आपला देह जळताना पाहून माधवला एक sms  आठवला,

मंजिल तो तेरी यही थी 
बस जिंदगी गुजर गई तेरी आते आते,
क्या मिला तुझको ईस दुनियासे 
अपनोनेही जला दिया तुझको जाते जाते।

     दुसर्या दिवशी लांब उभे राहूनच माधव अस्थिविसर्जन क्रिया बघत होता. अचानक पाठीवर थाप पडल्याने माधव बिचकला. मागे वळून पाहतोय तर काय विन्या दात काढून हसत म्हणाला, "मृत्युलोकात स्वागत! काय मध्या, कस वाटतंय मरून?"
"...?..."
"भांबवला ना? अरे मी पण भांबवलो होतो 6 महिन्यांपूर्वी."
विन्याचे भूत पाहून माधव गडबडला. पण लगेचच परिस्तिथी पाहून सावध झाला.

"विन्या, मला इतक्यात मरायचे नव्हते रे. खूप स्वप्न पूर्ण करायची होती."
"मध्या..."
"खूप स्वप्न होती रे!"

"रडू नको रे. रडून काय पुन्हा जिवंत होणारेस का? बर झालो आपण मेलो ते. जिवंत असताना किती मरणयातना भोगल्या. पोटासाठी काम करा. कामाचा ताप, तान-तणाव, आर्थिक अडचणी, मुलाचं शिक्षण, लग्न, बायकोचे आजारपण करत करत पार थकून गेलो होतो. आता विश्रांती घेतोय."
"तुझ खर आहे रे, पण मला..."

"मेल्यावर कुणाला उत्तरे द्यावी लागत नाही. मुळात मेल्यावर प्रश्नच पडत नाही. प्रश्न पडतात ते जिवंत असताना. त्यांची उत्तरे शोधत शोधत आयुष्य निघून जाते." विन्या हसतच बोलला.

"स्व:ताला काय मोठा तत्त्वज्ञ समझतोस का? दु:खाची कारणे हसून सांगायला मोठा स्तितप्रज्ञ लागून चालला का? "
"नाही रे मध्या, जिवंतपणी कुणा जीवंताचे सांत्वन इतके मनापासून केले नव्हते. मनापासून सांत्वन करतोय ते आत्ता, मेल्यावर आणि ते पण मेलेल्या माणसाचे." खी: खी: खी:

"विन्या, आता आपल काय होणार?"
"सगळ्याच जे होत ते होणार. माझ वर्षश्राद्ध होईपर्यंत मी भेटत जाईल तुला. नंतर मी कुठे तरी गायब होऊन जाईल सुध्याच्या आईसारखा."


"सुध्याच्या आईचा वर्षश्राध्द मागच्या महिन्यात झाला रे. मी गेलो होतो कार्यक्रमाला."
"हो माहितेय. बुंदीचा फडशा पडताना दिसला होता तू." खी: खी: खी:
"हलकट साला."

"सुध्याची आई भेटायची इथे. सुध्याचे गमतीदार किस्से संगायची. खूप हसायचो मी. साल्या तू इथे लवकर यायला पाहिजे होता. धमाल केली असती."

"माझ्या मरनावरच तापलेला होता का  @@@@@?"
"नाही रे." खी: खी: खी:

4-5 दिवसानंतर,
"घरातले सुतकी वातावरण पाहून खूप त्रास होतो रे. शांता, सुहास, सून आणि नातवंडाकडे पाहून खूप वाईट वाटते."
"मग दहाव्याला लगेच पिंडाला शिवणार वाटत!"
"हो."

"वा गड्या! तू जिवंत असताना सुहासला तुझ महत्व कळले नाही. तुझ्या उतारवयात त्याने तुमच्या सोबत रहावे हे कधीच कळले नाही. त्याचा राग तुझ्या मनात नाही??"
"बाप आहे रे मी त्याचा. मेल्यावर कसले आले राग लोभ."
"जा बाबा शिव त्या पिंडाला. पिंड ठेवल्या ठेवल्या कावळ्याला ईशारा कर. लगेच शिवतील ते पिंडाला."

     आज माधवचा दहावा. भरपूर लोक जमली. विधी झाला. कावळा लगेच पिंडाला शिवला. लोक जेवली. दुरूनच माधव सगळी घाई गर्दी बघत होता. आता वर्षश्राद्ध होईपर्यंत माधव असाच भटकणार. जिवंत असणार्यांच्या वेगवेगळ्या गमती जमती बघणार आणि हो आपल्या जोडीला कुणी येतंय का याची वाट बघणार.....

6 comments:

  1. आत्माचे निवेदन फक्कड जमले आहे.

    ReplyDelete
  2. लहानपणी शाळेत असे विषय असायचे, आत्मकथा लिहायचे, त्यावेळेला हा आत्म्याचे आत्मकथन हा विषय असता तर नक्कीच १० पैकी १० मार्क मिळवले असतेस.
    छान जमून आलेय.

    ReplyDelete
    Replies
    1. @भोवरा
      आपल्या प्रतिक्रियेबद्दल काय बोलू समझत नाहीये. धन्यवाद माझी दाखल घेतल्याबद्दल. कुणीतरी इतके मनापासून प्रतिक्रिया दिली याचा मला खूप आनंद होत आहे. आपल्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यास विलंब झाल्यामुळे क्षमस्व.

      Delete