Saturday, 28 July 2018

ती आणि तो



त्याच्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला गेला. त्याचा प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्यावर आला होता. त्याने कमी वेळात भला मोठा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा चंग बांधला होता आणि तो यशस्वी होण्याची चाहूल लागली होती. ह्या प्रोजेक्टनंतर आपले प्रमोशन होईल अशी त्याला आशा होती.

आजच काम आटपून तो पार्किंगमध्ये आला. हेल्मेट घालून शिळ वाजवत बाईकवर निघाला. त्याच्या सहकाऱ्यांना बाय बाय करत तो मुख्यदारापर्यंत आला. मुख्यदारातून बाहेर पडत असताना उजव्या बाजूने एक दुचाकी भरदावं वेगाने त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याने पाहिले आणि कचकन ब्रेक लावून बाईक थांबवली. बाईक थांबवताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. दुचाकीवाली त्याच्याकडे ओझरता कटाक्ष टाकून वेगाने पुढे निघून गेली त्याला पडलेला पाहून रखवालदार धावत पुढे आला आणि त्याला उठवण्यास मदत करू लागला. उठता उठता त्याने त्या पिवळ्या रंगाच्या दुचाकीवालीला मनातल्या मनात शिव्या घातल्या. त्याने मनाशी काही निर्धार केला आणि तो त्या पिवळ्या दुचाकीमागे सुसाट सुटला.

दोन चौक ओलांडल्यावर त्याने तिला गाठलेच आणि तिला कट मारून तो पुढे गेला. त्याची बाईक खूपच जवळून गेल्यामुळे ती गडबडली आणि पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत त्याच्या मागे निघाली. तो निवांत बाईक चालवत होता आणि अचानक ती मागून येऊन त्याला कट मारून पुढे गेली. आता तो परत चिडला. त्याने तिला परत कट  मारला. मग परत तिने त्याला.. ३ वेळा कट  मारून तो सिग्नलवर थांबला होता. ती त्याच्या मागेच येऊन थांबली होती. सिग्नल सुटणार तेव्हा त्याने उजव्या बाजूचे इंडिकेटर दिले आणि उजव्या बाजूला वळत असताना आरश्यात बघितले. त्याला ती दिसली. निळ्या रंगाच्या स्कार्फने तोंड बांधलेली आणि डोळ्यावर गॉगल घातलेली ती तिचा आंगठा खालच्या दिशेने दाखवत होती. जणू काही ती त्याला खुणवत होती कि बेटा इतक्यात हरलास काय.. लुझर... हे बघून तो चिडला आणि परत कट मारण्याची उर्मी आली पण क्षणात आठवले कि आज बाबांची दवाखान्यात अपॉइंटमेंट आहे. तोपर्यंत ती दुसऱ्या दिशेने निघून गेली. मग हा घरी आला.


ह्या प्रसंगानंतर तिसऱ्या दिवशी ती परत त्याच्या कार्यालयाच्या बाहेरून जाताना दिसली. तीच पिवळी बाईक. तोच निळा स्कार्फ. त्याने बाईक तिच्या मागे घेतली तिचा बाईक नंबर MH १५ MH १५१५ वाचून पाठ केला आणि तिला कट मारून पुढे गेला. आता तिची सटकली. तिने पण त्याला कट मारला. ३-४ वेळा एकमेकांना कट मारून झाल्यावर ते त्याच सिग्नलला आले जेथून दोघांचे रस्ते वेगवेगळे होते. तो तिच्या मागे जाण्याचा विचार करत होता. ती पुढे निघाली. ती कुठे जाणार आहे याचा अंदाज नसल्यामुळे तो तिच्या मागे हळूहळू चालला होता. थोड्यावेळाने मुख्य रस्ता सोडून तिने बाईक छोट्या रस्त्यावर वळवली. आता ते एका वसाहतीत पोहचले होते. अरुंद, वळणावळणाचे रस्ते आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांमुळे त्याचा वेग कमी झाला. तिच्या मागे जाऊन पण काय करणार ह्या विचारात असतानाच ती गायब झाली. इकडे तिकडे शोधून पण ती सापडली नाही. मग हा घरी परतला.

 
पुढच्या आठवड्यात असच २ वेळा झालं. दोन्ही वेळा ती ह्याला चुकांडी देऊन गायब झाली. आता त्याने ठरवलं कि तिचा शोध घायचाच. तिच्या वसाहतीत पोहचल्यावर तो तिच्याकडे लक्ष देऊ पाहत होता. एका वळणावर तिने तिची बाईक वळवल्या वळवल्या ती गायब झाली तेव्हा त्याच्या लक्षात आले कि ती संरक्षक भिंत आणि भिंतीला समांतर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या ३-४ फुट अरुंद जागेत बाईक लावून वाहनाचा आडोसा घेत लपली आहे.  हा पुढे जाऊन परत तिला बघायला आला तोपर्यंत ती फाटक उघडून बंगल्याच्या आवारात पोहचली होती आणि बंगल्याच्या ओट्यावर उभ्या असलेल्या मुलाला हात हलवून हाय करत होती. बहुदा हा तिचा भाऊ असावा. आज त्याला तिचा पत्ता मिळाला होता.


पुढच्या आठवड्यात त्याने ठरवले कि आपण तिच्या मागे जायचे नाही. ती आपल्या मागे येते का ते बघायचं. आज तो वेळेआधी कार्यालयाच्या मुख्यदाराजवळ आला आणि तिची वाट बघू लागला. (दररोज हा तिची वाट बघत होता पण असा दाखवत होता कि योगायोगाने भेट होत होती.) ती आली. ती गेली. कट  मारले गेले आणि त्याच्या त्या सिग्नलवर पोहचले. त्याने उजव्या बाजूचा इंडिकेटर अगोदरच दिलेला होता तिला संकेत देण्यासाठी कि आज मी तुझ्या मागे येणार नाहीये. सिग्नल सुटल्यावर तो उजवीकडे वळला पण ती सरळ निघून जात होती. ह्याने तिला उलट आंगठा दाखवत लुझर म्हणून चिडवले. पण ती बधली नाही. सरळ निघून गेली. त्याला वाटले कि तिला या गोष्टीची अपेक्षा नसेल म्हणून आपल्या मागे आली नसेल. उद्या परत एकदा प्रयत्न करू.  


दुसऱ्या दिवशी  दोघे जण सिग्नलजवळ आले त्याने उजवा इंडिकेटर दिला लगेच तिने पण उजवा इंडिकेटर दिला. पोरगा झाला ना भो खुश. तो पुढे ती मागे. हा तिला वेड्यावाकड्या रस्त्यातून नेत होता. इकडून तिकडून फिरवून तो गायब झाला. ती त्याला शोधात बसली आणि थोड्या वेळाने घरी परतली. त्याला आता आत्मविश्वास आला होता कि तो तिला पटवू शकतो. तिच्याशी संपर्क कसा करायचा ह्याचा विचार करत बसला. त्याला आयडिया सुचली.


पुढच्या दिवशी तो कार्यालयाच्या मुख्यदाराजवळ येऊन तिची वाट बघत बसला. तो तिला नेहमीच्या सिग्नलवर त्याच व्हिझिटिंग कार्ड देणार होता. पण आज सिग्नलवर ती मागे उभी होती. दोघांच्या मध्ये काही वाहने आली होती. सिग्नल सुटला. ती त्याच्या मागे आली आणि हा परत गायब झाला. पोरगं परत जाम खुश झालं. कासवगतीने का होईना प्रगती होत होती. दुसऱ्या दिवशी सिग्नलला दोघे एकमेकांच्या शेजारी थांबले होते. ह्याने चपळाई करत खिशातले कार्ड काढत तिच्या पुढे पकडले. तिने ते कार्ड सावकाश घेतले आणि जीन्स च्या खिशात ठेवले. आज कुणीच कुणाच्या मागे गेले नाही. आज दोघे जण एकमेकांचा विचार करत घरी गेले.


रात्र झाली. तो तिच्या फोनकॉलची वाट बघत बसला. आज कॉल नाही पण निदान मेसेज तरी येईल ह्या विचाराने सतरा वेळा मोबाईल बघत होता. पण तिचा कॉलही आला नाही आणि मेसेज पण नाही. अस्वस्थ मनानेच तो झोपायच प्रयत्न करत होता पण झोप काही आली नाही. रात्रभर तळमळत बेडवर पडून राहिला. 


पुढच्या दिवशी ती आलीच नाही. हा अजून अस्वस्थ झाला. कसाबसा घरी पोहचला. घरी कोणत्याही गोष्टींमध्ये त्याच लक्ष लागत नव्हते. सकाळी कार्यालयात आला. कुणालाही त्याने हाय हॅलो केले नाही. काहीतरी वाईट घडलय असं त्याला वाटत होत. काम करत असताना त्याला HR चा मेल आला. हा मेल सगळ्या स्टाफ साठी होता. मेलमध्ये सांगितलं होते कि पुढच्या आठवड्यापासून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचं केले आहे अन्यथा कार्यालयाच्या पार्किंग मध्ये दुचाकी लावू दिली जाणार नव्हती. हेल्मेट विकत घेण्यासाठी १ आठवड्याचा अवधी दिला होता.

मेल सोबत एक फाईल जोडली होती. त्याने ती फाईल उघडली. कुठल्यातरी वर्तमानपत्रातले कात्रण दिसत होत. शीर्षक होते दुचाकीचा अपघात,  युवती ठार. त्याने बातमी वाचायला सुरुवात केली. काल दि. २४ ला सकाळी ११ वाजता त्रंबकनाका परिसरात दुचाकी घसरून कु. वैशाली देशमुख हिचे अपघाती निधन झाले. वैशाली कामासाठी MH १५ MH १५१५ ह्या दुचाकीवर जात असताना घसरून खाली पडली आणि तिच्या डोक्याला मार लागल्याने आणि अति रक्तस्राव झाल्याने तीचा दुर्दैवी मुत्यू झाला. काय???  MH १५ MH १५१५ हि तर तिचीच बाईक होती. त्याच्या काळजात धस्स झालं. ३-४ वेळेस दुचाकी नंबर वाचून झाला तरी त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. आता तो हादरलाच..... नकळत त्याचे डोळे  भरून आले. जरावेळाने तो सावरला. पूर्ण बातमी वाचली. शेवटी लिहले होते कि तिने हेल्मेट घातले असते तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते.


त्यांची गोष्ट सुरु होता होताच संपली होती.





(काय मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? अभिप्राय द्यायला विसरू नका. ह्याच गोष्टीचा दुसरा भाग बनवला तर चालेल का? आपले मत कळवा.)


     

    







   

No comments:

Post a Comment