बर्याच महिन्यानंतर काल फोटो स्टुडीओमध्ये जाण्याचा योग आला. पासपोर्ट साईझ फोटो काढायचे होते. त्यामुळे मी माझा एक फोटो एडीट करून पेन ड्राईव मध्ये घेऊन गेलो. (फोटोचा ब्याकग्राउंड एडीट केला फक्त. तसा मी दिसायला स्मार्ट आहे. त्यामुळे चेहर्याला एडीट करायची गरज नव्हती तरी पण उगाच छंद म्हणून चेहरा एडीट केला.) स्टुडीओ तर पुर्णपणे डिजीटल होता. कॉम्पुटरला जोडण्यासाठी वेगवेगळे डिव्हाईसेस टेबलावर रचलेले होते. स्टुडीओमधल्या प्रत्येक भिंतीवर फोटो लावलेले. हनुवटीवर बोट ठेऊन लाजणाऱ्या मुली असो वा गॉगल घालून दबंग बनणारे कॉलेजची पोर असो, गणवेश घातलेले शाळकरी पोर-पोरी असो वा म्हातारे-कोतारे. सगळे मस्त दिसत होते. स्टुडीओ मालकाचे पुरस्कार स्वीकारतानाचे, सोम्या गोम्या कलावंताबरोबरचे बरेच फोटो होते.
मालक स्व:ता कॉम्पुटरवर एडिटिंग करत बसला होता. एका फोटोमध्ये 3 जन होते. त्यातून त्याने एका गृहस्थाचा फोटो वेगळा केला. टी शर्ट घातलेल्या त्या गृहस्थाला चक्क कोट आणि टाय परिधान करवला. (कोट आणि टाय मध्ये पण विविधता होती. गिऱ्हाइकाणे रंग सांगण्याचाच काय तो उशीर लगेच कोट आणि टाय तयार.) च्यायला, कमाल आहे ह्यांची. त्या माणसाने जीवनात कधी शर्टइन केली नसेल पण त्याचा शेवटचा फोटो मात्र टाय आणि कोट मध्ये! (शेवटचा फोटोच होता हे मी छातीठोक पणे सांगू शकतो कारण फोटो तयार होऊन आल्यावर तो फक्त भिंतीवर लावण्याच्याच आकाराचा होता.) असो, असतात एक एक जन असे.
म्हटले आता आपण पण थोडी गम्मत पाहू. म्हणून माझा फोटो न देता सहजच उभा राहिलो. आता तर कहर म्हणावा लागेल असे एडिटिंग चालू होते. टक्कल असलेल्याला नवी हेअर स्टाईल बहाल करण्यात आली तर चेहऱ्यावर कायमस्वरुपी असणारा जखमेचा व्रण गायब करण्यात आला. काळ्याला गोरा बनवला आणि चष्मावाल्याला गॉगल घातला. (तो चष्मावाला मी नव्हतो हे पहिलेच सांगून देतो.) ढवळ्याचे काळे केले गेले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या तारुण्यपिटीका कि काय म्हणतात त्या उडवण्यात आल्या. असो, असतात एक एक जन असे.
भरपूर एडिटिंग पाहिल्यावर मी माझा पेन ड्राईव दिला. माझा फोटो एडीटरने पेन ड्राईव मधून कॉम्पुटरमध्ये कॉपी केला. फोटोमध्ये मी मस्तच दिसत होतो. (तसा मी दिसायला लहानपणापासूनच छान दिसतो. आता तर फोटोला एडिटिंगची थोडीफार साथ होतीच.) असो विषयांतर झाले पण खरे ते काय बोललो. पण त्याच्या एकही एडिटिंग सोफ्टवेअर मध्ये उघडत नव्हता. (आईच्या गावात! मी तो फोटो एडीट केल्यावर कसा काय सेव्ह केला काय माहित.) खूप वेळ गेल्यावर मी बोललो, "जाऊ द्या, नसेल ओपन होत तर द्या माझा पेन ड्राईव." एडीटर म्हणाला, "2 मिनिट थांब आणि माझी करामत बघ." मग मी परत गम्मत बघायला सज्ज!
त्याने माझा फोटो कॉम्पुटरवर उघडला, स्व:ताचा भारीमधला कॅमेरा पोतडीतून बाहेर काढला आणि कॉम्पुटर स्क्रिन वर क्लीक केला. (आइला! हि होती त्याची करामत!) हातचे गिऱ्हाईक जाऊ न देण्याची कला पाहून वाटले हा मराठी माणूस नसणारच! पण भिंतीवरच्या सप्तशृंगी मातेचा फोटो पाहून तो मराठीच माणूस आहे हे माझ्या चाणाक्ष नजरेने ओळखले. (तसा मी लहानपणापासूनच हुशार आहे. एव्हाना हे तुमच्या चाणाक्ष बुद्धीला लक्षात आले असणारच.) मग त्याच्या एडिटिंगची स्तुती करून त्याला खुश करून टाकले. (तरी पण त्याने डिसकौंट नाही दिला.) माझे फोटो घेतल्यावर त्या सप्तशृंगी मातेला आणि त्या मराठी स्टुडीओ मालकाला मनोमन नमस्कार करून मी स्टुडीओ बाहेर पडलो.