Saturday, 23 February 2013

हॉस्टेल

   
दोन्ही हातात एक एक बॅग आणि पाठीवर एक सॅक घेऊन धन्वी लिफ्टच्या बाहेर येऊन ४१५ नंबरच्या रूम समोर थांबली. तीने लॉबीमध्ये दोन्ही बाजूला बघितले. शुकशुकाट होता. ४ -५ रूम्सच्या बाहेर डस्टबिन, झाडू, चपला दिसल्या. त्या ४- ५ रूम्स सोडल्या तर बाकी सगळ्या रूम्स समोर धुळीचे साम्राज्य होत. बहुतेक खुप दिवसात इथे कुणी झाडू मारलेला नसेल. जीन्सच्या खिशामधून चावी काढून तिने दाराच्या कीहोल मध्ये चावी टाकली. चावी फिरवून दार उघडतांना कर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज झाला. रूममध्ये जाऊन धन्वीने बॅगा आत नेल्या. तिने रूम मध्ये सभोवार नजर फिरवली. रूम स्वच्छ होती. रूममध्ये तीन बेड, तीन टेबलं, तीन खुर्च्या आणि तीन कपाट होते. खिडकीशेजारच्या टेबलंवर काही पुस्तकं दिसत होती. त्याच्या शेजारच्या कपाटाला कुलूप लावलेले होते. बहुदा कुणीतरी राहत असावे असं तीला वाटले.


धन्वी आज खूप थकलेली होती. तिने एका बेडवर अंग टाकले आणि पडल्या पडल्या विचार करू लागली. तिला तीच जुनं हॉस्टेल आठवले. तिथली रूम आणि मैत्रिणी आठवल्या. तिचा डिप्लोमा कोर्स ज्या कॉलेजमध्ये पूर्ण झाला त्याच कॉलेज मध्ये तिला डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीसाठी ऍडमिशन पाहिजे होती. पण दुसऱ्या राऊंड पर्यंत तिला ते कॉलेज मिळाले नाही. मग जे कॉलेज मिळालं तिथे नाईलाजानं ऍडमिशन घेऊन त्यांच्याच हॉस्टेलमध्ये ती दाखल झाली. दहावीपर्यंत गावात शिकलेली धन्वीचा मोठ्या शहरात निभाव लागेल का या चिंतेने तिची आई तिला शहरात शिकवायला पाठवण्यास तयार नव्हती. पण बाबांमुळे ती शहरात शिकायला आली. डिप्लोमाच्या तीन वर्षांत ती खूप कॉन्फिडन्ट आणि मॉडर्न झाली. आज ती ऍडमिशन घ्यायला एकटीच आली होती. डिप्लोमाच्या ऍडमिशनच्या वेळी तिला होस्टेलवर सोडण्यासाठी तीच पूर्ण खानदान आले होते. हे आठवून तिला हसूच आल. बेडवर पडल्या पडल्या तीला झोप लागली. ३ तासांच्या झोपेनंतर तिला जाग आली तेव्हा तिने बघितले तर रूमचा दिवा लावलेला होता. उठून बघितलं तर खिडकीच्या बेडवर एक मुलगी झोपलेली होती. धन्वीने तिच्याकडे बघितले तेव्हा तिची रूम पार्टनर पण उठून बसली. औपचारिक गप्पागोष्टीमधून धन्वीला रूम पार्टनरची माहिती मिळाली. तीच नाव रेखा. रेखा पण छोट्या गावामधून आली होती. फर्स्ट इयर फार्मसीला शिकत होती. कॉलेजला उशिरा जात आणि रात्री उशिरा झोप असे. रेखा थोडी लाजरी बुजरी होती. स्वतःहून जास्त बोलत नव्हती. आपण पण डिप्लोमाला असेच होतो हे धन्वीच्या मनात आले.


धन्वीला खूप भूक लागलं होती. तिने रेखाला मेसची वेळ विचारली आणि जेवायला सोबत जाऊ असे सांगितले. रेखाने तिचे जेवण झाले असल्याचे सांगितले. मग धन्वी एकटीच जेवायला गेली. जेवण करून रूमवर यायला धन्वीला खूप वेळ लागला होता. जेवण झाल्यावर होस्टेलच्या लायब्ररीमध्ये पुस्तकं चाळत बसली होती. ती रूममध्ये आली तेव्हा रेखा रूममध्ये नव्हती. धन्वीने बॅगेतून सामान काढून कपाटामधे लावले आणि अलार्म लावून झोपून गेली. रात्री अचानक कसल्याशा आवाजाने धन्वीला जाग आली. बघितले तर रेखा खिडकीच्या बाहेर हात काढून काहीतरी करत होती. बहुदा पावसाचा आनंद घेत होती.


दुसऱ्या दिवसापासून धन्वीने स्वतःचा टाइमटेबल बनवला. तीच कॉलेज सकाळी ८ वाजता होते. म्हणून लवकर उठणे, दिवसभर कॉलेज, संध्याकाळी कोचिंग क्लास आणि अभ्यास आणि रात्री लवकर झोपणे. उशिरा झालेलं ऍडमिशन आणि त्यात डायरेक्ट सेकंड इयरच्या वर्गात आल्यामुळे कोणीच तिला त्यांच्या ग्रुपमध्ये घेत नव्हते. मेसमध्ये तिला नूतन बद्दल कळाले. ती पण तिच्याच वर्गात होती. डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन. तिला पण कोणी ग्रुपमध्ये घेत नव्हते. मग नूतन आणि धन्वीची ओळख झाली आणि त्या दिवसभर बरोबर राहू लागल्या.


धन्वी आणि रेखा रूम पार्टनर असून पण त्यांची २-२ दिवस गाठभेट होत नसे. दोघी जणी आपआपल्या लाईफ मधे बिझी होत्या. कधीतरी रात्री हाय हॅलो पुरत्या भेटत असत. त्यावेळी पण धन्वी अर्धवट झोपेत असे. रेखाच पण शेड्युल वेगळे असल्यामुळे धन्वीला त्रास होत होता. ती रात्री अपरात्री रूमच्या बाहेर जात येत असे. त्यात लाईट फॅन कधीपण चालू बंद करत असे. धन्वीला रोज रात्री निरनिराळ्या आवाजाने जाग येत. कधी जोरदार कर्णकर्कश्श किंकाळी ऐकू येत. पण भीतीमुळे ती तोंडावरचे पांघरून पण काढत नसे.


एके रात्री उशिरा धन्वी होस्टेलच्या लायब्ररीमधून नूतन बरोबर लिफ्ट मध्ये गेली. नूतनचा रूम तिसऱ्या मजल्यावर होता. नूतन तिसऱ्या मजल्यावर उतरून गेली. लिफ्ट चौथ्या मजल्यावर आल्यावर धन्वी लिफ्टमधून बाहेर आली. तेवढ्यात लॉबीच्या लाईट्स ऑफ झाल्या. टक... टक... असा फरशीवर काठी मारल्याचा आवाज यायला लागला. धन्वी खूप घाबरली. लिफ्टच बटण दाबून लिफ्ट उघडण्याची वाट बघत बसली. तोपर्यंत लिफ्ट खाली निघून गेल्याचे तिने डिस्पलेवर बघितले. तितक्यात जिन्यातून लहान मुलाचा रडन्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र धन्वीचा धीर सुटला. ती धावत तिच्या रूमकडे निघाली. तितक्यात एक टॉर्चचा झोत तिच्या अंगावर आला. धन्वी स्तब्ध झाली. रेखाला हाक मारून दार उघडायला सांगायचे असे ठरवून ती पूर्ण ताकदीने ओरडली. पण तिची वाचाच बंद झाली होती. तिचा आवाजच निघेना. तितक्यात जिन्याकडून एक स्त्री चा भेसूर रडण्याचा आवाज आला. मनामध्ये देवाचं नाव घेत ती कशीबशी तिच्या रूमपर्यंत पोहचली. दार वाजवून बघितले पण आतून काहीही प्रतिक्रिया आली नाही. बहुदा रेखा रूममध्ये नसावी. तितक्यात सरक्कन टॉर्चचा एक झोत धन्वीच्या अंगावरून गेला. धन्वीला चावी सापडेना. तिच्या लक्षात आले कि चावी नूतनच्या पर्समध्ये राहिली. आता जिन्यातून खाली जावे लागणार ह्या भीतीने धन्वी पांढरीफटक पडली. तितक्यात मोठ्याने आवाज आला, "सोड मला, मला एकच बळी पाहिजे." हे ऐकून धन्वी अर्धमेली झाली. तिने मोठ्या आवाजात हनुमान चालीसा सुरु केली. तिची वाचा परत आली. तेवढ्यात खूप मोठ्याने मुलींचा हसण्याचा आवाज आला आणि अचानक लाईट्स ऑन झाले. सगळ्या मुली हसत खिदळत धन्वीकडे येत होत्या. धन्वीला कळायला वेळ लागला कि ह्या मुलींनी तिला उल्लू बनविले होते. त्या सगळ्या मुली त्याच फ्लोअर वर राहत होत्या. आता मात्र धन्वी चिडली होती. रॅगिंगच्या विरोधात ती कंप्लेंट करणार होती. पण सगळ्या मुलींनी तिची माफी मागितली. आणि हे प्रकरण तिथेच मिटले.


त्या रात्रीनंतर धन्वीला रोज रात्री वाईट स्वप्न पडत. कधी कधी तिला विचित्र आवाज येऊ लागले. नूतनने तिला समजावून सांगितले कि त्या भुताच्या मस्करीमुळं तुला असे भास होत आहे. रेखाला पण २- ३ वेळा सांगून पहिले कि किमान लाईट्स फॅन खूपदा ऑन ऑफ करू नकोस. वेगवेगळे आवाज काढू नकोस. पण रेखाने मी असं काही करत नाही सांगितले.


एके रात्री धन्वी गाढ झोपलेली होती. अचानक तिला खूप विचित्र आवाज यायला लागले. तिने डोळे उघडून बघितले तर लाईट्स ऑफ होते. फक्त रेखाची खिडकी उघडी होती. बाहेरून थोडाफार प्रकाश येत होता. त्या खिडकीपाशी रेखा हात बाहेर काढून विचित्र आवाज काढत होती. ती हसत होती. हे बघून धन्वीला खूप चीड आली. धन्वीला वाटले कि रेखा बॉयफ्रेंड बरोबर मोबाईलवर बोलत आहे. हिच्यामुळे रोज माझी झोप मोड होते. हिला उद्या बघून घेऊन असे मनाशी ठरवत धन्वी रागातच झोपली. सकाळी उठून बघितले तर रेखा रूम मध्ये नव्हती. कॉलेज मध्ये गेल्यावर तिने नूतनला रात्री काय झालं ते सांगितलं. नूतनला पण ह्या सगळ्या गोष्टीची चीड आली. तिने धन्वीला रूम बदलण्याचा सल्ला दिला. तिसऱ्या मजल्यावर रूम रिकामी असल्यास ती रूम घ्यायची अथवा नूतन चौथ्या मजल्यावर येऊन धन्वीच्या सोबत ४१५ नंबरची रूम सोडून कोणत्याही रूम मध्ये शिफ्ट व्हायचं ठरलं. कॉलेज झाल्यावर नूतन आणि धन्वी होस्टेलवर आल्या आणि ऑफिसमध्ये गेल्या.

रेक्टर : "काय काम आहे ?"

धन्वी : "रूम बदलायची आहे."

रेक्टर : "का?"

धन्वी : "मला आणि माझ्या ह्या मैत्रिणीला एकाच रूम मध्ये राहायचे आहे."

रेक्टर : "दुसरे काही कारण आहे का? कारण उद्या तुमची भांडणं झाली तर परत याल रूम बदलायला. काही तरी ठोस कारण सांगा."

नूतन : "मॅडम, हिची रूम पार्टनर खूप विचित्र आहे. खूप त्रास होतो तिच्यामुळे. रात्री उशिरापर्यंत फोन वर बोलत असते. कधी पण लाईट फॅन ऑन ऑफ करते. विचित्र हसते. रात्री अपरात्री रूमच्या बाहेर असते." नूतन खूपच घडाघडा बोलायला लागली.

रेक्टर : "अरे बास...बास !! बोलताना थोडा श्वास तर घे. "

थोडा वेळ विचार करून रेक्टर मॅडम दुसरी रूम द्यायला तयार झाल्या. मॅडम कंप्युटर रेकॉर्ड बघायला लागल्या.

रेक्टर : "तिसरा मजला पूर्ण भरलेला आहे. चौथ्या मजल्यावर ९ रूम्स रिकाम्या आहे. कोणती रूम देऊ?"

धन्वी : "लिफ्टजवळची! !"

रेक्टर : " तुझी सध्याची कोणती रूम आहे?"

धन्वी : "४१५ , चौथ्या मजल्यावर कोपर्यातली शेवटची रूम."

रेक्टर मॅडम रेकॉर्ड तपासायला लागल्या.

रेक्टर : "कोणती रूम? नाव काय आहे तुझे आणि तुझ्या रूममेटचे?"

धन्वी : "धन्वी आणि रेखा, ४१५ "

रेक्टर मॅडम परत रेकॉर्ड तपासायला लागल्या.

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे त्रासलेले होते.

धन्वी : "काय झाले मॅडम? "

रेक्टर : "तुला तर रूम पार्टनरच नाही!!! "

धन्वी : "???"

रेक्टर : "तुझ्या रूम मध्ये तू एकटीच राहत आहे. रेखा मागच्या वर्षी राहत होती. ती मागच्या वर्षीच रूममध्ये मृतावस्थेत सापडली होती...."

मॅडमच बोलणे धन्वीच्या कानावर पडत होते पण डोक्यात जात नव्हते.... नूतन धन्वीला सावरायला जाण्यापूर्वीच धन्वी जमिनीवर कोसळली होती.....